निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर
By मेहरून नाकाडे | Published: October 18, 2022 07:21 PM2022-10-18T19:21:03+5:302022-10-18T19:21:39+5:30
परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे
रत्नागिरी : अद्याप परतीचा पाऊस जिल्ह्यात धुमाकूळ घालत असतानाच निसर्गातील बदलामुळे ऑक्टोबरमध्ये आंब्याला मोहोर आला आहे. मजगाव येथील राजन कदम यांच्या आंबा बागेतील दोन कलमांना मोहोर आला आहे. बागायतदार कदम मोहोर वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असून आतापर्यत त्यांनी बुरशी व कीटकनाशक फवारणी केली आहे. त्यामुळे मोहोर चांगला आहे.
गेल्या आठवड्यात एका कलमाच्या फांदीला मोहोर निदर्शनास आला होता. मात्र आठवडाभरात दोन कलमांना चांगलाच मोहोर आला आहे. परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे. वानरांचा होणारा उपद्रव लक्षात घेता दोन कलमांसाठी राखणी ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे बागायतदार कदम यांनी कलमांच्या भोवती जाळी बांधली आहे. पावसामुळे मोहोराचे नुकसान होवू नये यासाठी त्यांनी ताडपत्री बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊन, पाऊस तसेच ढगाळ हवामान यामुळे मोहोरावर कीडरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी केली आहे. हवामान खात्याने दि.२० ऑक्टोबर पर्यंतच पाऊस असेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे तूर्तास मोहोर संरक्षणासाठी ताडपत्री बांधलेली नसली तरी पावसाचा अंदाज घेत ताडपत्री बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मोहोर चांगला असून कोणत्याही रोगाचा प्रादूर्भाव नाही. मोहोर सुरक्षित राहिला तर फळधारणा होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे.
निसर्गातील बदलामुळेच एेन पावसाळ्यात मोहोर आला आहे. मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय अवघड काम आहे. मोहोराचा अंदाज घेत फवारणी करणे आवश्यक आहे. पावसापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. मोहोर वाचला तर नक्की फळधारणा चांगली होईल. - विनोद हेगडे, तंत्र, कृषी अधिकारी, कृषी विभाग, रत्नागिरी.
गेल्या आठवड्यात झाडाच्या एका फांदीला मोहोर निदर्शनास आला होता. मात्र हळूहळू मोहोर पूर्ण झाडाला आहे. सध्या तरी दोनच झाडांना मोहोर आहे. मोहोराचे वानरापासून संरक्षण करण्यासाठी जाळी लावली आहे. तसेच पावसापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री बांधण्याचा निर्णय घेतला आहे. - राजन कदम, बागायतदार