दोन दिवसांनंतर रस्ते गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:10+5:302021-04-13T04:30:10+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले ...
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे लक्षात येताच, शासनाने दोन दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यानंतर, सोमवारी पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत होती.
मच्छीमार आर्थिक अडचणीत
राजापूर : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायाला मंदी आली आहे. त्यातच खलाशांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. माशांची मरतूक कमी होत असल्याने त्यांची आवक घटल्याने मासे महाग झाले आहेत.
विकास कामांकडे लक्ष देण्याची मागणी
रत्नागिरी : हजारो लोकवस्ती असलेला राजीवडा गाव विकासापासून वंचित आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या गावात ना रस्ता सुस्थितीत, ना पाण्याचा पुरेसा पुरवठा, त्यामुळे लोकांचे हाल होत असून, नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रात्री ग्राहकांची पाठ
खेड : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रशासनाने रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याने, हॉटेल, धाबे वेळेवरच बंद करण्यात येत आहेत. रात्री ग्राहकही पाठ फिरवत असल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर होत आहे.
अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त
चिपळूण : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यात येणारी झाडे, छोट्या व्यापाऱ्यांच्या टपऱ्या, वाडीतील अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. या रस्ता रुंदीकरणात रस्त्यांची उंची व रस्त्यांची पातळी नीट ठेवून रस्ता रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
गुहागर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पशुसंवर्धन करत आहेत. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात अधिकाऱ्यांची कमतरता असताना, असलेले अधिकारी लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे.