मंडणगड तालुक्यात सापडले डेंग्यूचे दोन रुग्ण
By Admin | Published: November 18, 2014 09:51 PM2014-11-18T21:51:03+5:302014-11-18T23:28:18+5:30
पेढांबेतील मृत वृध्दाचा लेप्टोसदृश आजाराने मृत्यू
मंडणगड : मुंबई, पुणे या महानगरांमध्ये थैमान घातलेल्या डेंग्यू या आजाराची तालुक्यातील दोन रुग्णांना लागण झाल्याची माहिती भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयातून मिळाली आहे.
यासंदर्भात रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रभाकर भावठणकर यांनी अधिक माहिती दिली. शेनाळे येथील विषयतज्ज्ञ शिक्षक राजेंद्र हरिश्चंद्र रेवाळे (४४) हे काही कामासाठी मुंबई येथे गेले होते. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे असताना त्यांना तापाची जाणीव होऊ लागली होती. ते मंगळवारी भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हजर झाले होते. रक्त तपासणी केली असता त्यांना डेग्यूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून, पुढील उपचार सुरु आहेत.
याचबरोबर वडवली येथील दिपेश दिलीप मोडकले (२२) हा मुंबई येथे राहात असून, काही कामानिमित्त तो त्याच्या वडवली या गावी आला होता. मुंबई येथे असतानाच आठ दिवसांपासून त्याला तापाची लक्षणे जाणवत होती. आज तो भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हजर झाला असता त्यालाही डेंग्यूची लागण झाल्याचे सिध्द झाले़ आरोग्य विभागाने या तरुणाला उपचारासाठी भरती करुन घेतले. (प्रतिनिधी)
पेढांबेतील मृत वृध्दाचा लेप्टोसदृश आजाराने मृत्यू
आरवली : पेढांबे येथे मृत झालेल्या तीन व्यक्तींपैकी धोंडू गोविंद मते (६०) यांचा अहवाल लेप्टोसदृश आढळून आला असून, इतर दोन मृतांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. मात्र, लेप्टोसदृश रुग्ण आढळल्याने लेप्टोची साथ जाहीर करण्यात आली आहे. रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य अधिकारी व्ही. आर. रायभोळे यांनी दिली आहे.
माखजन आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या पेढांबे येथे तीन व्यक्ती मागील पंधरा दिवसांमध्ये मृत झाल्याचे समोर आले आहे. यातील ११ नोव्हेंबरला झालेल्या धोंडू गोविंद मते (६0) या व्यक्तीच्या मृत्यू अहवालामध्ये लेप्टोसदृश रोग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही व्यक्ती एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत झाली आहे. अरविंद लक्ष्मण वरवाटकर आणि आशिष संतोष येलोंडे या दोन्ही व्यक्तींचे अहवाल अजून उपलब्ध होऊ शकले नाहीत. यातील आशिष येलोंडे यांच्या उपचारादरम्यान कोणतीही लेप्टोची लक्षणे दिसून आली नसल्याचे माखजन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डी. व्ही. महाडिक यांनी सांगितले. अरविंद वरवाटकर हे मुंबई येथे मृत झाल्याचे महाडिक यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून साथ जाहीर करण्यात आली असून, तातडीच्या उपचार योजना करण्यासाठी दोन पथके कार्यरत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी व्ही. आर. रायभोळे यांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण ११ जणांची तपासणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)