परस्परांमध्ये झालेल्या झुंजीत दोन गवारेड्यांचा मृत्यू, संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 15:23 IST2021-08-10T15:22:35+5:302021-08-10T15:23:15+5:30
Ratnagiri News: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळच असणाऱ्या किरबेट गावात जवळच असणाऱ्या जंगलामध्ये मंगळवारी दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले आहेत.

परस्परांमध्ये झालेल्या झुंजीत दोन गवारेड्यांचा मृत्यू, संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील घटना
साखरपा - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळच असणाऱ्या किरबेट गावात जवळच असणाऱ्या जंगलामध्ये मंगळवारी दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले आहेत. या दाेघांची एकमेकांशी झुंज हाेऊन मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारे गवा रेड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्मीळ घटना घडली आहे. त्यामुळे तेथील परिसरात मृत झालेले गवारेडे पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
किरबेट गावातील जंगलात काही ग्रामस्थ मंगळवारी सकाळी गेले असता त्यांना हे दाेन गवारेडे मृतावस्थेत पडलेले दिसले. दाेन्ही रेडे एकमेकांच्या जवळच पडलेले असल्याने त्यांच्यामध्ये जाेरदार झुंज झाली असावी, असा कयास ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी याबाबत पाेलीस पाटील यांना माहिती देताच त्यांनी वनविभागाला कळविले.
या प्रकाराची माहिती मिळताच देवरूख, साखरपा येथील वनविभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यासाेबत पशुवैद्यकीय अधिकारीही आहेत. वनविभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू असून, त्यांच्या अहवालानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे, याची माहिती मिळणार आहे. किरबेट परिसरात गवारेड्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हाेते. अनेकांनी या भागात अनेकवेळा गवा रेडाही पाहिला हाेता. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रारी आल्या होत्या.