पालखी नाचवण्यावरून दोन गटात राडा, ८ जण जखमी, रत्नागिरीतील वेरवलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:54 PM2023-03-15T17:54:34+5:302023-03-15T17:54:52+5:30
दोन्ही गटातील ९ जणांवर गुन्हे दाखल
लांजा : मांडावर पालखी नाचवण्यावरून झालेल्या वादातून घरी जाताना दोन गटात राडा झाल्याची घटना साेमवारी (१३ मार्च) रात्री वेरवली खुर्द राणेवाडी (ता. लांजा) येथे घडली. या हाणामारीत ८ जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील ९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
संतोष सीताराम राणे (४५) यांनी फिर्याद दिली आहे. मांड या ठिकाणी पालखी नाचविण्यासाठी गेलो असता शैलेश श्रीधर राणे यांनी मला व एकनाथ गुणाजी राणे यांना पालखी नाचविण्यास विरोध केला. त्यावेळी आमच्यामध्ये झटापट झाली व शैलेश याने हाताने मारहाण केली. मांडावरील ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. त्यानंतर एकनाथ राणे व महेश मनोहर राणे आणि त्यांच्या पाठीमागून शैलेश व त्यांचा पुतण्या रोशन चालले होते. मारुती मंदिर येथे रात्री ११:४५ वाजता हे समोरासमोर आल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यातून पुन्हा हाणामारी झाली.
यावेळी सुगंधा श्रीधर राणे व चिराग भगवान राणे यांनी काठ्यांनी संतोष याच्या डोक्यात व कपाळावर प्रहार केला. तसेच एकनाथ राणे यांना भगवान राणे, भाग्यश्री राणे, सुगंधा राणे यांनी काठीने मारहाण केली. तसेच महेश मनोहर राणे यांना भगवान राणे यांनी दुखापत केली. याप्रकरणी पाेलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर शैलेश श्रीधर राणे (४०) यांनी परस्परविराेधी फिर्याद दाखल केली आहे. मांडावर झालेल्या वादानंतर मी व माझा पुतण्या रोशन घरी जात असताना एकनाथ राणे यांनी बोलावून जाब विचारला व गालावर मारले. त्यावेळी तेथे असलेले महेश मनोहर राणे, संतोष सीताराम राणे, प्रमोद विष्णू राणे यांनी शिवीगाळ केली.
तर महेश याने हातातील काठीने शैलेशच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या खांद्यावर मारले. त्यावेळी पुतण्या रोशन सोडवण्यासाठी पुढे आला त्यालाही मारहाण केली. यावेळी शैलेश याचा भाऊ भगवान, भावजय भाग्यश्री, पुतण्या चिराग, आई सुगंधा हे घराकडून मांडावर जात हाेते. त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, हेडकाॅन्स्टेबल अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रमिला गुरव, चालक दिगंबर पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या मारहाणीत जखमी झालेल्या ८ जणांवर लांजा येथे उपचार सुरू आहेत.