Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:24 PM2022-06-28T19:24:08+5:302022-06-28T19:24:42+5:30

शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे.

Two groups in Shiv Sena, Ordinary Shiv Sainiks remain confused due to Eknath Shinde revolt | Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

Next

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : शिवसेनेच्या जिल्ह्यातील चार आमदारांपैकी दोघांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने आपण काय करायचे, कोणासोबत जायचे असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर आहे. शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे. हातातला भगवा कायम ठेवावा की, बंडाचा झेंडा घ्यावा, यात असंख्य शिवसैनिक अडकले आहेत.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला. दहा-बारा गेले, अजून जाणार अशा चर्चा पहिल्या दिवशी होत्या. दुसऱ्या दिवशीपासून जाणाऱ्यांची संख्या वाढली आणि शिवसैनिक गोंधळले. बंड यशस्वी होणार की पक्ष त्यांना परत आणणार, एवढेच प्रश्न शिवसैनिकांच्या मनात होते.

जिल्ह्यात उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (चिपळूण), राजन साळवी (राजापूर) आणि योगेश कदम (दापोली) हे शिवसेनेचे चार आमदार आहेत. यातील योगेश कदम यांनी सर्वांत आधी शिंदे गट गाठला आणि रविवारी मंत्री उदय सामंत गुवाहाटीला बंडखोर गटात सहभागी झाले.

या दोन्ही आमदारांची पक्षातील कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध आहेत. हे दोघेही शिवसेनेत सक्रिय होण्याच्या आधीपासूनच शिवसेना मजबूत होती. मात्र, या दोघांनी आपापल्या मतदारसंघात ही मजबुती वाढवली आहे. पक्षाइतकेच त्यांच्याशी प्रामाणिक आसलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळेच आता काय करायचे, असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

‘इधर चला मै, उधर चला...’

ज्यांनी बंडात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच दापोली, खेड, मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमित अवस्थेत आहेत. इकडे जायचे की तिकडे हा निर्णय घेताना त्यांना अडचण येत आहे. सध्या कोणी अधिकृतपणे बोलत नसले तरी आपापसात याच विषयाची चर्चा केली जात आहे.

दापोलीत आधीच फेरबदल

शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांपैकी योगेश कदम यांच्या मतदारसंघात शिवसेनेत आधीपासूनच दोन गट झाले आहेत. दापोली-मंडणगडच्या नगरपंचायत निवडणुकीत योगेश कदम यांना बाजूला केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी तत्काळ संघटनेत फेरबदल केले. योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी बाजूला करण्यात आले. त्यामुळे तेथे पदाधिकारी बाजूला जाण्याची शक्यता कमी आहे.

सामंत यांची पकड

२०१४ मध्ये उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिवसेनेत गेले. यथावकाश त्यांना पदेही दिली गेली. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक महत्त्वाच्या पदांवर सामंत यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी आहेत. त्यावर सामंत यांची चांगली पकड आहे. सामंत यांनी कामे देऊन अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल.

राष्ट्रवादीशी आघाडी नको

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याला शिवसैनिकांचा मुळातच ठाम विरोध होता. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे. ज्यांच्याशी सातत्याने विरोधात लढलो आहोत, वाद घातले आहेत, आरोप केले आहेत, त्यांच्यासोबतच एकत्र राहण्याला शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षासाेबत आहोत, असे सांगणाऱ्या अनेक सामान्य शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदे यांचा मुद्दा पटलेला आहे.

आम्ही सामंतांसोबत

रत्नागिरी शिवसेनेतील जे पदाधिकारी उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत आले, त्या सर्वांमध्ये यापुढेही सामंत यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ठाम आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे काही पदाधिकारी मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. एकीकडे सामंत यांची साथ, त्यांचा वरदहस्त हवा असतानाच दुसरीकडे पद सोडावे लागेल, हे दु:खही आहे.

Web Title: Two groups in Shiv Sena, Ordinary Shiv Sainiks remain confused due to Eknath Shinde revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.