सुमो झाडावर आदळून दोन ठार

By admin | Published: June 5, 2016 12:13 AM2016-06-05T00:13:39+5:302016-06-05T00:13:39+5:30

कुवे येथील दुर्घटना : मृतात चालकासह एक मुंबईचा; ९ जण गंभीर जखमी

Two killed in Sumo tree | सुमो झाडावर आदळून दोन ठार

सुमो झाडावर आदळून दोन ठार

Next

लांजा : देवदर्शन करून परत जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील टाटा सुमो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात चालकासह दोघे ठार झाले, तर अन्य ९ जण गंभीर, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता कुवे येथे घडली.
रवींद्र शांताराम भाताडे (४०, मुंबई), चालक मंगेश दत्ताराम डोंगरे (४५, वाघणगाव) असे ठार झालेल्याचे नाव असून, यामध्ये वाघणगावच्या पोलिसपाटील अश्विनी विजय माईल (५०), संकेत विजय माईल (२२), साहिल विजय माईल (१७), तेजस प्रकाश माईल (१६), तुषार प्रकाश माईल (१९), सुदेश पांडुरंग चौकेकर (२१), अथर्व रवींद्र भाताडे (११), खेतल विजय भाताडे (२१), नुपुरा रवींद्र भाताडे (३८) हे गंभीर जखमी झाले आहेत.
तालुक्यातील वाघणगाव येथील अश्विनी विजय माईल यांच्या घरी मुंबईतून भाताडे कुटुंबीय आले होते. शनिवारी सकाळी चालक मंगेश दत्ताराम डोंगरे यांच्या मालकीची असलेली टाटा सुमो (एमएच-०४-जीई- २५६८) ही गाडी घेऊन नाणीज येथे फिरण्यासाठी हे दोन्ही कुुटुंबीय निघाले. दुपारी नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज मठामध्ये दर्शन घेऊन ते पुन्हा लांजा येथे आले. लांजात आल्यानंतर घरामध्ये लागणाऱ्या चिजवस्तू, बरोबर गोडेतेलाचे दोन डबे, मिठाची एक बॅग असे सामान खरेदी केले. यानंतर ते लांजा कुवेमार्गे वाघणगावला जात होते. लांजाहून जवळपास ३ किलोमीटर गेल्यावर हा अपघात घडला. चालक मंगेश याला वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी समोरील आकेशियाच्या झाडावर जाऊन आदळली. त्यावेळी गाडीमध्ये १२ जण होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक मंगेश डोंगरे याचा सायंकाळी उशिरा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोंगरे हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या बरगड्यांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघात घडल्याचे लक्षात येताच महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यातील प्रवाशांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
अपघात झाल्यानंतर जखमी सर्व जणांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेचे चालक संदेश घडशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहिकेचे चालक रणजित सार्दळ, मराठा सेवा संघाच्या रुग्णवाहिकेचा चालक राजू जाधव, राजू हळदणकर, शिवाप्पा उकली, योगेश सुर्वे, संजय यादव, तुषार लांजेकर आदींनी मदत केली. लांजा ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमींना दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये नितीन माईल हा किरकोळ जखमी झाला असल्याने त्याने अपघाताची खबर लांजा पोलीस स्थानकात दिली आहे.
खबर मिळताच लांजा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भागत, हेड कॉन्स्टेबल सुरेश शिरगावकर, ललित देऊसकर, नंदू सावंत, संतोष झापडेकर, चालक सतीश साळवी, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed in Sumo tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.