रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल सव्वादोन लाख ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज
By शोभना कांबळे | Published: July 18, 2024 07:18 PM2024-07-18T19:18:59+5:302024-07-18T19:19:23+5:30
रत्नागिरी : ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन ५७ हजार २६९ तर ऑफलाइन पद्धतीने १ लाख ...
रत्नागिरी : ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन ५७ हजार २६९ तर ऑफलाइन पद्धतीने १ लाख ६२ हजार ८०८ असे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याला एकूण असलेल्या २ लाख ९३ हजार ६७६ उद्दिष्टांपैकी ७४.९४ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात राजापूर तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून, दिलेल्या २९,९३७ उद्दिष्टांपैकी २८,९०४ दाखल झाले आहेत. या तालुक्याचे ९६.५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
महिलांना सक्षम करण्यासाठी, तसेच महिला घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, यासाठी राज्य सरकारने १ जुलैपासून ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ’ ही योजना राबविण्याचा देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात जोरात सुरु आहे. महिला लाभार्थींना या योजनेचा लाभ घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत तसेच काही जाचक कागदपत्रेही कमी केली आहेत.
२१ ते ६५ वयोगटापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेच, पण आता महाराष्ट्राबाहेर असलेल्या माहेरवाशिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वयोगटातील महिलांमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्जाबरोबरच ऑफलाइन अर्जही स्वीकारण्यात येत आहेत. जिल्ह्यात दोन्ही प्रकारे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांचे अर्ज दाखल झाले आहेत.