संगमेश्वरात गोठ्यात सापडली बिबट्याची दोन पिल्ले, एक मृत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 05:58 PM2022-10-21T17:58:39+5:302022-10-21T17:59:05+5:30
सुस्थितीत असलेल्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले. या पिल्लाच्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मौजे रांगव - धनगरवाडी येथील एका गोठ्यात दोन बिबट्याची पिल्ले आढळली. यातील एक पिल्लू जिवंत असून, दुसरे मृतावस्थेत आहे. वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर जिवंत बिबट्याच्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे रांगव - धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या गवळवाडीमधील गोठ्यामध्ये बिबट्याची दोन पिल्ले दिसली. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला यांना माहिती दिली. वनपाल तौफिक मुल्ला यांनी अधीनस्त कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी बिबट्याची दोन पिल्ले आढळली. त्यापैकी १ नर पिल्लू अर्धवट खाल्लेले मृतावस्थेत होते, तर दुसरे जिवंत होते. या मृत बिबट्याच्या पिल्लाचे देवरुख येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडून विच्छेदन करून घेतले. सुस्थितीत असलेल्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले. या पिल्लाच्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
हे ट्रॅप कॅमेरे लावण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे व त्यांच्या टीमने मदत केली आहे. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. यापुढे वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आल्यास किंवा संकटात सापडल्यास त्यासंबंधी वन विभागाच्या १९२६ या हेल्प लाईनवर तसेच निम्न स्वाक्षरीकर्ता यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागातर्फेरत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.