आणखी दोन जनावरे मृत्यूमुखी
By admin | Published: April 5, 2016 10:35 PM2016-04-05T22:35:29+5:302016-04-06T00:22:57+5:30
मुदतबाह्य इंजेक्शन : देवाचे गोठणेतील प्रकाराने खळबळ
राजापूर : मुदतबाह्य इंजक्शन दिल्यानंतर देवाचेगोठणे गावात अत्यवस्थ झालेल्या जनावरांमध्ये आणखी दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, मृत जनावरांचा एकूण आकडा तीनवर पोहोचला आहे. दरम्यान, देण्यात आलेली इंजक्शन्स ही पशुवैद्यकीय विभागातर्फे देण्यात आली. प्रत्येकाकडून पन्नास रुपये घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती मालकांनी दिली आहे.
देवाचेगोठणे गावातील रोहिदास गुरव, विवेक भालचंद्र नारकर व नितीन माया जाधव यांच्या जनावरांना गोचीड मरण्याची इंजक्शन्स देण्यात आली होती. त्यानंतर सर्वच्या सर्व जनावरे अचानक अत्यवस्थ झाली. त्यापैकी रविवारी रोहिदास गुरव यांच्या दुभत्या गाईचा मृत्यू झाला होता. उर्वरित जनावरांमध्ये विवेक भालचंद्र नारकर यांचा रेडा मृत्युमुखी पडला असून, रोहिदास गुरव यांच्या एका गाईचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याशिवाय आणखी दोन वासरे अजूनही अत्यवस्थ असून, त्यांचा धोका कायम आहे. या आजारी सत्तावीस जनावरांमध्ये विवेक नारकर यांची सहा, नितीन जाधव यांची चार, तर रोहिदास गुरव यांची सतरा जनावरे असल्याची माहिती पुढे आली आहे.
या सर्व जनावरांवर उपचार सुरु असले तरी वेळेवर उपचार न झाल्याने सर्वच जनावरे अत्यवस्थ होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत.
पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने देवाचेगोठणे गावात जनावरांना इंजक्शन्स देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी न जाता त्यांच्याऐवजी चक्क शिपाई गेला होता. त्यानेच ते लसीकरण केल्याची माहिती जनावरांच्या मालकांनी दिली, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय आपल्याकडून प्रत्येक जनावरामागे पन्नास रुपये घेतल्याची माहिती विवेक नारकर यानी पत्रकारांना दिली. ते घेतलेले पैसे कोणत्या कारणासाठी होते ते आपल्याला सांगण्यात आले नाही, अशीही माहिती विवेक नारकर यांनी दिली.
एवढ्या जनावरांना लसीकरण करावयाचे असतानाच तेथे डॉक्टरऐवजी शिपाई कसा पाठवला गेला? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पशुवैद्यकीय अधिकारी फिरकतच नसल्याची कैफियत यावेळी मांडण्यात आली. (प्रतिनिधी)
दुर्लक्ष : पशुधन मालकांकडे पाठ
पशुधन कमी होत असताना दुसरीकडे ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांच्याबाबत पशुवैद्यकीय खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होत आहे. या विभागाबद्दल देवाचेगोठणेत नाराजी आहे.
कोणती कारवाई?
पशुवैद्यकीय खात्याने दिलेली इंजेक्शन ही मुदतबाह्य होती. त्याबाबत आता संबंधितांवर कोणती कारवाई होणार? असा सवाल केला जात आहे.