जिल्ह्यात आणखी दोन खासगी कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:50+5:302021-04-21T04:31:50+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १९ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. यामध्ये शासकीय कोविड केअर सेंटर १६, तर पेड कोविड केअर सेंटर ३ कार्यरत आहेत. पेड कोविड सेंटरमध्ये आणखी दोन सेंटरची नव्याने भर पडली आहे.
आतापर्यंत बेडची संख्या १३२० असून, आज ७२० कोविड रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
सध्या जिल्ह्यात चिपळूण येथे आयुसिद्धी आणि संजीवनी तसेच लांजातील छोटूभाई देसाई अशी तीन हाॅस्पिटल्स पेड कोविड केअर सेंटर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरीत मराठा रेसिडन्सी आणि कोहिनूर हाॅटेल ही दोन पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
कोविडची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते. त्यांची रोज दिवसातून तीन वेळा तापमान, ऑक्सिजन, रक्तदाब आदींची तपासणी केली जाते. या केअर सेंटरमध्ये ६ मिनिट वॉक टेस्ट दिवसातून दोनदा केली जाते. ६ मिनिट वॉक टेस्ट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून, त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे लवकर निदान होते.
लक्षणे असणाऱ्या व सौम्य लक्षणे व कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी ६ मिनिट वॉक टेस्ट करावी. ज्या व्यक्तींचे वय ६० वर्षांखाली असेल तसेच ज्यांना कोमॉर्बिडिटी नाही व कोविड १९ची लक्षणे नाहीत; परंतु कोविडची तपासणी केल्यास पॉझिटिव्ह आली, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविकांमार्फत केली जाते. प्रत्येक कोविड व्यक्तींची ६ मिनिट वॉक टेस्ट केली जाते, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.