‘आशापुरा मायनिंग’विरोधात दोन मतप्रवाह
By admin | Published: March 27, 2016 01:03 AM2016-03-27T01:03:03+5:302016-03-27T01:03:03+5:30
उद्या ठरणार भवितव्य : हजारो हातांना रोजगार मिळाल्याचे मत पण...
दापोली : आशापुरा मायनिंगच्या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून, दुसरीकडे या मायनिंगमुळे हजारो हाताला रोजगारही मिळाला आहे. अनेकांनी लघुउद्योग सुरु केले आहेत. कंपनीच्या आर्थिक उलाढालीवर स्थानिक बाजारपेठेत तेजी आली होती. त्यामुळे ही कंपनी सुरु राहायला हवी, असा दुहेरी मतप्रवाह पहायला मिळत असून, कंपनीचे भवितव्य येत्या २८ मार्च रोजी ठरणार आहे.
आशापुरा कंपनीने केळशी पंचक्रोशीत १० वर्षापूर्वी मायनिंगचे काम सुरु केले. या कंपनीला सुरुवातीच्या काळात स्वार्थापोटी काही लोकांनी विरोध केला होता. परंतु, त्यानंतर मात्र त्याच लोकांनी कंपनीमध्ये ठेके घेतले होते. विरोध करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपले उखळ पांढरे करुन घेतले. पूर्वी अनेक विरोध झाले. परंतु, ते फार काळ टिकले नाहीत. ज्या-ज्या लोकांना काम मिळाले त्यांनी अन्य लोकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे स्थानिक जनता मात्र कंपनीला विरोध करुन थकली. विरोध करणाऱ्यांनी पुढारपण मिरवून ठेके घेतले आणि त्यानंतर जनतेची साथ सोडली. त्यामुळे कंपनीला होणारा विरोध दुबळा झाला आहे.
कंपनी विरोधातील लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांना कंपनीकडून कामसुद्धा मिळाले नाही. परंतु त्यांच्या म्होरक्याला मात्र लाखो रुपयांचे ठेके मिळाले. यापूर्वी विरोध करणाऱ्या गावपुढाऱ्यांनी केवळ मलई खाण्याचेच काम केले. त्यामुळे या पूर्वीचे आंदोलन हे वैयक्तिक स्वार्थापोटी झाल्याचा इतिहास आहे. कंपनीने काम दिले की, कंपनीच्या बाजूची भूमिका घ्यायची. कंपनीत ठेका मिळाला नाही की, विरोध करायचा असा उद्योग काही गावपुढाऱ्यांचा सुरु आहे. त्यामुळे या कंपनीबाबत ग्रामस्थांमध्ये दोन बाजूचे मतप्रवाह असल्याचे दिसून येत
आहे.
पर्यावरण प्रदूषणाची काळजी घेणाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी ‘एन्रॉन’ अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा करुन लोकांचे नुकसान केले होते. दाभोळचा भारती शिपयार्ड प्रकल्प डबघाईला आला असून, तालुक्यात रोजगार उपलब्ध करुन देणारा एकही प्रकल्प नाही.
दापोली तालुक्यातील केळशी परिसरात आशापुरा मायनिंग हा रोजगार उपलब्ध करुन देणारा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे हा प्रकल्प समुद्रात बुडवायला काही मंडळी निघाली आहेत. (प्रतिनिधी)