माहिती देणारे दोन पोलिस निलंबित
By Admin | Published: February 3, 2017 11:58 PM2017-02-03T23:58:43+5:302017-02-03T23:58:43+5:30
खासदारांच्या नावे फसवणूक प्रकरणी कारवाई
रत्नागिरी : खासदारांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या संतोष नारायणकर याच्याकडून पैसे घेऊन त्याला तपासासंदर्भातील माहिती पुरविणाऱ्या शहर पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी निलंबित केले. हेडकॉन्स्टेबल श्रीनिवास गजानन नाटेकर आणि कॉन्स्टेबल गणेश शंकर शिंदे अशी त्यांची नावे आहेत. या दोघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संतोष नारायणकर याने खेड तालुक्यातील साखरोली गावातील १० कामाची सुमारे एक कोटी ७० लाखांची निविदा तयार करून खासदार अजय संचेती यांची खोटी सही करून जिल्हाधिकारी कार्यालयात ई-मेल पाठविला होता. तो खोटा असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा नियोजन कार्यालयातील शांताराम देशमुख यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचबरोबर संतोषचा मोबाईल नंबर व बँक खाते क्रमांक घेऊन या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीनिवास नाटेकर व कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांना अलवार, राजस्थान येथे पंजाब बँकेच्या शाखेतून संतोष नारायणकर याच्या खात्याचे रेकॉर्ड आणण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी नाटेकर व शिंदे यांनी रेकॉर्ड ताब्यात घेतानाच संतोष नारायणकरला शोधूनही काढले होते. त्याच्याकडून १५ हजार रुपये घेऊन हे दोघे रत्नागिरीत परत आले. आपण त्याचा शोध घेतला असून, तो आपल्याला सापडला नाही, असा अहवाल त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिला.
पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी नाटेकर आणि त्याच्याबरोबर राजस्थानला गेलेला गणेश शिंदे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर दोघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, संतोष नारायणकर याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पोलिस येताहेत, पळून जा
पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी संतोष नारायणकर प्रकरणाचा छडा लावण्यास सांगितले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक राजस्थान येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हेडकॉन्स्टेबल नाटेकर याने लगेचच संतोष नारायणकर याला फोनवरून पोलिस येत आहेत, पळून जा, अशी माहिती दिली. याबद्दल आपल्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्याची सूचना केली.
नारायणकरने तत्काळ नितीन ढेरे यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. ‘मी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा पीए बोलतोय, संतोष नारायणकरला अटक करू नका,’ असे स्वत: संतोषनेच ढेरे यांना सांगितले; परंतु संतोष याचा मोबाईल नंबर नितीन ढेरे यांच्याकडे असल्यामुळे हा आरोपी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा नारायणकरचे बँकेचे रेकॉर्ड मागविले. त्यात हेडकॉन्स्टेबल श्रीनिवास नाटेकर याचा खाते क्रमांक पोलिसांना सापडला.