पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 03:18 PM2020-09-07T15:18:49+5:302020-09-07T15:20:00+5:30
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी दुपारी १२ वाजता आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बाहेर निघून गेले. यानंतर ते संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. ते पोहायला गेले असावेत, अशी शंका आल्याने त्यादृष्टिने काहींनी शोध सुरू केला. त्यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई - कासार कोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची दुचाकी व काही वस्तू आढळल्या. त्यानंतर नदीत शोधमोहीम सुरु करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरुख पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांना शोधासाठी बोलावण्यात आले. त्यांनी पहिला मृतदेह ११. ३० वाजता शोधून काढला. याच वेळी देवरुखमधील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिध्दू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये तेथे आले. त्यांनीही शोधकार्यासाठी मदत केली. दुपारी दीडच्या सुमाराला दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हातीव व कासारकोळवणमधील ग्रामस्थांनीही शोधकार्यात मदत केली.
दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत.
लॉकडाऊमुळे गावी
यातील अमित माईन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते. तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तोही आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करणार होता. या घटनेने दोघांची स्वप्न अधुरी राहिली आहेत.
दोघे बालंबाल वाचले
या घटनेत मृत झालेले दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्या सोबत पोहायला जाणार होते. मात्र, या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोहोचले. मात्र, फक्त दुचाकी दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली त्यानंतर शोधमोहीम सुरु झाली.