वणव्याच्या आगीत दोघेजण होरपळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:21+5:302021-04-15T04:30:21+5:30
मंडणगड : तालुक्यातील तिडे येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेसह रिक्षाचालक वणव्याच्या आगीत होरपळल्याची घटना घडली. दोघांनाही ...
मंडणगड : तालुक्यातील तिडे येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेसह रिक्षाचालक वणव्याच्या आगीत होरपळल्याची घटना घडली. दोघांनाही अधिक उपचारासाठी दापोलीला हलविण्यात आले असून, दोघेही सुदैवाने बचावले आहेत.
या संदर्भात ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंबळे तिडे रस्त्यावर तिडे गावानजीक रस्त्यालगत लागलेल्या गवताच्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोट उठले होते. यावेळी कुबळे ते तिडे व तिडे ते कुंबळे असा प्रवास करणाऱ्या दोन रिक्षा एकमेकांवर परस्पर आदळून अपघात झाला. यात दुर्वा दुर्गेश देवघरकर (वय २६, रा.तिडे) व शब्बीर जोगीलकर (वय ५५, रा.तिडे) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातात जोगीलकर यांची रिक्षा वणव्याच्या आगीत पडली. त्यामुळे ते दोघेही होरपळले. कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रथमोपचार करुन त्यांना अधिक उपचाराकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
महिला गर्भवती
या अपघातात जखमी झालेल्या दुर्वा देवघरकर या गर्भवती आहेत. त्या ४५ टक्के भाजल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृतीही स्थिर आहे.