Ratnagiri: राजापुरातील दोन विनापरवाना कातभट्ट्या वनविभागाकडून सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:31 IST2025-02-20T13:30:49+5:302025-02-20T13:31:24+5:30
खैर तोडीवरही निर्बंध

संग्रहित छाया
राजापूर : विनापरवाना सुरू असलेल्या दोन कातभट्ट्या राजापूर वनविभागाने सील केल्या आहेत. कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राजापूर वनविभागाकडून देण्यात आली.
पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. जिल्हा वनविभागाने सर्वच कातभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत.
राजापूर तालुक्यात एकूण चार कातभट्ट्या होत्या. यापैकी दोन कातभट्ट्या गेली काही वर्षे बंद आहेत. राजापूर शहरानजीक उन्हाळे येथे पन्हळेकर हर्बल प्रॉडक्ट्स व मठखुर्द येथे परब कातउद्योग समूह अशा दोन कातभट्ट्या सुरू होत्या. राजापूर वनविभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये या दोन्ही कातभट्ट्यांवर छापा टाकून सुमारे १,४४० किलो इतके कातद्रव्य जप्त केले होते.
विनापरवाना कातभट्टी चालविल्याप्रकरणी या दोन्ही कातउद्योगाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.
आता वनविभागाने ६ व ७ फेब्रुवारी रोजी या दोन्ही कातभट्ट्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मालकांच्या समक्ष त्या सील केल्या आहेत.
खैर तोडीवरही निर्बंध
खैराच्या झाडावर प्रक्रिया करून त्यापासून कात बनवला जातो. वर्षानुवर्षे जिल्ह्यात हे व्यवसाय सुरू आहेत. त्यातही चिपळूण तालुक्यात खैर लागवड आणि कातभट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. वनविभागाने तेथेही अनेक ठिकाणी छापे टाकून कातभट्ट्या बंद केल्या आहेत. पर्यावरणाच्या मुद्यावरुन खैर तोडीवर निर्बंध आहेत. ते कात भट्ट्यांसाठीच तोडले जात असल्याने अशा भट्ट्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे.