गावठी दारूचे दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:56 PM2017-08-27T23:56:14+5:302017-08-27T23:56:14+5:30

Two victims of dummy drunk | गावठी दारूचे दोन बळी

गावठी दारूचे दोन बळी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी /देवरूख /साखरपा : गावठी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा-पेठवाडी येथे रविवारी घडली. एकजण अत्यवस्थ असून त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिमद्यप्राशनाने या दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. काशीनाथ रघुनाथ कनावजे (वय ५३), गजानन गोविंद पवार (८२) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलीस आणि ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, भडकंबा पेठवाडी येथील काशीनाथ कनावजे,
गजानन पवार आणि अशोक लक्ष्मण
केळकर (५३) हे शनिवारी सायंकाळी मद्यप्राशन करण्यासाठी जमले होते. ते गावठी दारू पित असतानाच अचानक त्यांना उलट्या होऊ लागल्या. हे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात तातडीने हलविले.
मात्र, गजानन पवार याचा साखरपा येथेच मृत्यू झाला. अन्य दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच काशीनाथ कनावजे यांचाही मृत्यू झाला. अशोक केळकर यांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद साखरपा पोलीस दूरक्षेत्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत झाली आहे. अतिमद्यप्राशनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
ऐन गणेशोत्सवात गावठी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे भडकंबा पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. यातील गजानन पवार यांच्यावर भडकंबा येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
काशीनाथ कनावजे यांचा मृतदेह रात्री उशिरा गावात आणण्यात आला. त्यांचा एक मुलगा चेन्नई येथे आहे. ही घटना कळताच तो तातडीने भडकंब्याकडे येत आहे. रात्री उशिरा तो पोहोचेल, त्यानंतर काशीनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
गावठी दारूचा महापूर; पोलिसांचे दुर्लक्ष
संगमेश्वर तालुक्यात गावठी दारूचा महापूर आला आहे. भडकंबा पंचक्रोशीत अनेक ठिकाणी गावठी दारू विक्रीचे अड्डे आहेत.
भडकंब्यातही आहे. गावातील अनेकजण गावठी दारूच्या आहारी गेलेले आहेत. या तिघांनी काल तेथूनच ही दारू आणली असावी, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. गावठी दारू विक्रीचे हे अड्डे बंद करण्याची मागणी पोलीसपाटील संघटनेने यापूर्वीच पोलिसांकडे केली आहे. मात्र, पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. याला पोलीस आणि दारु विक्रेत्यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
परशुरामवाडी गावठी दारूचे केंद्र
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारु विक्री सुरु असल्याचे आढळून येईल तेथील पोलीस अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला होता. तरीही जिल्ह्यात गावठी दारू विक्रीचे अड्डे सुरूच आहेत.
देवरुखजवळील परशुरामवाडी हे याचे केंद्र आहे. तेथून परिसरातील २६ गावांना दारू पुरवली जात असल्याचा आरोप आहे. बळी गेल्यावरच पोलीस कारवाई करणार का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
विषारी दारुचा संशय
गावठी दारूतून विषबाधा
होऊन या दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय
ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Two victims of dummy drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.