बालकासह दुचाकी चोरटे रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:50 AM2019-11-28T11:50:47+5:302019-11-28T11:54:43+5:30
त्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रत्नागिरी : शहरातील दुचाकी चोऱ्यांचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. मंगळवारी रात्री गस्तीच्यावेळी नाचणे रोड येथे संशयितरित्या फिरणाऱ्या चौघांची चौकशी केली असता, दुचाकी चोऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. एका विधीसंघर्षित बालकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले.
रत्नागिरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे तसेच घरफोडी, दुकानफोडीचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी व गुन्हे उघडकीला आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांना मार्गदर्शन केले होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये यश राजकुमार शर्मा (१९, रा. घुडेवठार, रत्नागिरी), सुरज सुरेश सकपाळ, (१९, रा. तेली आळी, रत्नागिरी), विघ्नेश देंवेद्र भाटकर (१९, रा. तोणदे, भंडारवाडी, रत्नागिरी) व एक विधीसंघर्षित बालक अशा एकूण चारजणांचा समावेश आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पांडुरंग गोरे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, सुभाष भागणे, मिलिंद कदम, संजय जाधव, पोलीस नाईक अमोल भोसले, उत्तम सासवे, अरुण चाळके, गुरुनाथ महाडिक, विजय आंबेकर, नितीन डोमणे, अरुण चाळके, सागर साळवी, रमिझ शेख, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला.
चोरीची कबुली
रत्नागिरी शहर परिसरामध्ये गस्त घालण्याचे काम सुरु होते. २६ नोव्हेंबर रोजी रात्री नाचणे रोडवर दोन संशयास्पद मोटारसायकल व चारजण दिसले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, रत्नागिरी शहर परिसरामधून दुचाकींची व सायकलची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
मुद्देमाल हस्तगत
त्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.