कोल्हापुरातील व्यावसायिकाची दुचाकी आढळली आंबा घाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:12 PM2020-09-28T16:12:39+5:302020-09-28T16:17:49+5:30
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ एमएच ०९ डीजे ४८६३ या क्रमांकाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली आहे. असित गोरधनभाई सुतरिया (५२, राजारामपुरी, १३वी गल्ली, अपूर्वा टॉवर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या व्यावसायिकाची ही दुचाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा घात की अपघात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ एमएच ०९ डीजे ४८६३ या क्रमांकाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली आहे. असित गोरधनभाई सुतरिया (५२, राजारामपुरी, १३वी गल्ली, अपूर्वा टॉवर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या व्यावसायिकाची ही दुचाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा घात की अपघात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
असित सुतरिया हे सनमाईक मार्केटिंगकरिता २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमाराला गेले होते. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातून ते बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते बेपत्ता असल्याची माहिती चेतन गोपाळ चांगेला (४५, रा. कोल्हापूर) यांनी २६ सप्टेंबर रोजी साखरपा पोलीस स्थानकात दिली आहे.
दुचाकीपासून काही अंतरावर एक मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. या मोबाईलद्वारे काही माहिती मिळते का, याचा शोध सुरू आहे. कोल्हापूर येथील व्यावसायिकाची दुचाकी आंबा घाटात सापडल्याने हा घात आहे की अपघात याचे गूढ निर्माण झाले आहे.
या तपासासाठी साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, सहाय्यक पोलीस फौजदार संजय उकार्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदेश जाधव आणि सहकारी, राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी शोध मोहीम राबवली. मात्र, त्यांच्या हाती अन्य कोणतीच पुरावा आढळलेला नाही.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन
बेपत्ता झालेल्या व्यक्तीची उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. अंगात जांभळ्या रंगाचे फुल शर्ट, काळ्या रंगाची पँट, हातात घड्याळ, पायात स्पोर्ट्स बूट, काळ्या रंगाची सॅक, नोकिया कंपनीचा मोबाईल होता. २४ सप्टेंबरपासून ही व्यक्ती बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.