दुचाकी पुलावरून कोसळून राजापुरातील तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 06:10 PM2020-12-17T18:10:50+5:302020-12-17T18:12:12+5:30
Accident, Bike, Ratnagiri, rajapur भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडला.
राजापूर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडला.
पुलाखाली असलेल्या दगडावर आपटून गंभीर दुखापत झाल्याने गौरव जागीच गतप्राण झाला. तो राजापूरहून भू गावाकडे जात असताना हा अपघात घडला. भरधाव वेगामुळे हर्डी कातळडा धबधब्यानजीक गौरवला दुचाकीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तो रस्ता सोडून या पुलावरुन खाली कोसळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस हवालदार बबन जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नगरसेवक सौरभ खडपे, आंबेवाडीतील सतीश बंडबे, संतोष कातकर, मंदार बंडबे, भास्कर कुवळेकर, दादू बोटले आदींसह या परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनाम्यानंतर पोलिसांनी सौरभ याचा मृतदेह विच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
भावाने ओळखले
अपघातात मृत्यमूमुखी पडलेल्या गौरव याचा भाऊ याच मार्गावरून जात होता. त्याला याबाबत माहिती मिळाली असता तो घटनास्थळी दाखल झाला. त्याने सौरभला ओळखले. भावाचा मृतदेह समोर पाहून तोही हादरून गेला.
सुट्टीमुळे राजापुरात आला
गौरव जाधव हा सेंटरींगचे काम करतो, बुधवारी सुट्टी असल्याने तो राजापूर शहरात आला होता. राजापुरातून घरी जात असताना हा अपघात झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.