Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:58 PM2022-04-19T12:58:32+5:302022-04-19T12:59:13+5:30
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
खेड : ओव्हरटेक करत असताना समाेरुन येणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अथर्व माेहन सावंत (वय-२५, रा. पेढांबे, ता. चिपळूण) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मुंबई - गाेवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील धामणदेवी (ता. पाेलादपूर) हद्दीत आज, मंगळवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
याबाबत माहिती अशी की, दुचाकीला धडक दिलेला ट्रक (एमएच ०४, डिके ७२५८) तळोजा ते लोटे असा जात हाेता. या ट्रक वरील चालकाने ओव्हरटेक करून विरुद्ध दिशेला जाऊन समाेरुन येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०८, एव्ही ३७२६) ठाेकले. ही धडक इतकी भीषण हाेती की, चालक अथर्व सावंत याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्गाचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकरही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केले. जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तसेच अपघाताची खबर मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, नवनाथ घोलप यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
यावेळी मुकुंद मोरे, सनी जाधव, विघ्नेश जाधव यांनी घटनास्थळी पोलिसांना मदत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.