दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; रत्नागिरीतून १ दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:25 PM2019-01-12T15:25:32+5:302019-01-12T15:27:14+5:30
रत्नागिरी शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीचे सत्र सुरू आहे. हे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती आहे. याबाबत पोलीस तपासात फारसे यश आलेले नाही. असे असतानाच शहरातील मिथिला हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी : शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीचे सत्र सुरू आहे. हे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती आहे. याबाबत पोलीस तपासात फारसे यश आलेले नाही. असे असतानाच शहरातील मिथिला हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यात रस्त्यावरच नव्हे तर घराच्या अंगणात उभ्या करून ठेवलेल्या दुचाकींच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी शहरातील मिथिला हॉटेलच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला अनिरुध्द प्रभाकर जोशी (४२, रा. बी-६, साईसंकल्प, आर.टी.ओ. आॅफिस रोड, रत्नागिरी) यांनी त्यांच्या मालकीची हिरोहोंडा कंपनीची अॅक्टीव्हा ही ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी २ जानेवारी ते ८ जानेवारी २०१९ या कालावधीत उभी करून ठेवली होती. ही दुचाकी चोरीस गेली. त्यानंतर जोशी यांनी याबाबत शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नागिरी शहरात गेल्या महिनाभराच्या काळात अनेक दुचाकींची चोरी झाली आहे. त्यातील अभावानेच काही दुचाकी सापडल्या आहेत. मात्र अनेक दुचाकींचा शोध अद्यापही लागलेला नाही. त्यामुळे दुचाकी चोऱ्या करून त्या जिल्ह्याबाहेर लांबच्या ठिकाणी विक्री करण्यात येत आहेत का, त्याचे पार्टस वेगळे करून विक्री होत आहे का, याबाबत आता शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात २०१८ या वर्षभरात ४४२ चोºयांचे प्रकार घडले आहेत. त्यातील अनेक चोऱ्या या दुचाकींच्या व मोबाईल हॅण्डसेटच्या आहेत.
दुचाकींच्या चोऱ्या करण्यामागे टोळी कार्यरत असावी, अशी चर्चा जनतेत आहे. चोरीला गेलेले मोबाईलही सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे चोरलेल्या दुचाकी व मोबाईल अन्य राज्यांमध्ये विक्री होत असल्याचीही चर्चा आहे.