रत्नागिरी, चिपळूण बाजारपेठेत दुचाकींना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:29+5:302021-05-08T04:33:29+5:30
- दुचाकी वाहनधारकांना आता हेल्मेटसक्ती लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडून नव्याने काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ...
- दुचाकी वाहनधारकांना आता हेल्मेटसक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडून नव्याने काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ यावेळेत मुभा देण्यात आली आहे़ मात्र, रत्नागिरी आणि चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीतील गर्दी लक्षात घेऊन बाजारपेठेत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे़ केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश राहणार असून, रत्नागिरी, चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीत दुचाकी वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे़
शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७, दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू करून खंड २, ३, ४ मधील तरतुदींनुसार अधिसूचना काढण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे़ त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने संदर्भ अ.क्र.५ च्या अधिसूचनेद्वारे काेरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० प्रसिद्ध केलेले आहेत.
या अधिसूचनेनुसार सकाळी ७ ते ११ वाजता या वेळेत जीवनावश्यक वस्तूंसाठी (दूध, अन्नधान्य, भाजीपाला इ.) खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, यावेळेत रत्नागिरी आणि चिपळूण नगर परिषद हद्दीतील बाजारपेठेमध्ये दुचाकी वाहनचालक माेठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये काही दुचाकी वाहनचालक विनाहेल्मेट प्रवास करीत असून, मोटार अधिनियम १९८८ च्या कलम १२९ या कलमाचा भंग करत आहेत.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या खासगी वाहनांची वाहतूक बंदी केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील मालवाहतूक वाहनांना मुभा राहणार आहे. आदेशाच्या पालनासाठी बॅरिकेटची व्यवस्था पोलीस यंत्रणेने करावी, असे म्हटले आहे़ तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार पोलीस विभाग किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.