कामथेतील डॉक्टर मारहाणप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:51 AM2021-05-05T04:51:04+5:302021-05-05T04:51:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : बाळंतीण मतिमंद मुलीच्या बाळाचे डीएनए तपासणीवरून झालेल्या वादानंतर डाॅक्टरला मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : बाळंतीण मतिमंद मुलीच्या बाळाचे डीएनए तपासणीवरून झालेल्या वादानंतर डाॅक्टरला मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला हाेता. या मारहाणीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भुस्कुटे तसेच राधा लवेकर यांच्यावर चिपळूण पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण येथील एका मतिमंद मुलीची एका सामाजिक संस्थेच्या देखरेखीखाली तिची व बाळाची शुश्रूषा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर तरतुदीनुसार नवजात बालकाचे डीएनए तपासणी करणे आवश्यक असल्याने पोलिसांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थेच्या भुस्कुटे आणि लवेकर या शनिवारी १ मे रोजी कामथे रुग्णालयात गेल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप यांना फोन करून कल्पना दिली होती.
काही तांत्रिक कारणास्तव बाळाला कामथे रुग्णालयात पोहचवण्यात उशीर झाला आणि तोपर्यंत डॉ. सानप हे दुपारच्या जेवणासाठी घरी गेले होते. परंतु, त्यांनी येथील अन्य डॉक्टरांकडे ही जबाबदारी दिली होती. मात्र, येथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत भुस्कुटे यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाचाबाची, हमरीतुमरीवर प्रकरण आले आणि भुस्कुटे व लवेकर यांनी येथे उपस्थित असलेले डॉ. मारुती कुंडलिक माने यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली, अशी फिर्याद डॉ. माने यांनी दिली आहे. त्यानुसार भुस्कुटे व लवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे या करीत आहेत.
याबाबत कामथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सानप म्हणाले की, आता कोविडचा काळ सुरू आहे. सर्वच डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. ताण प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी संयम ठेवणे गरजेचे आहे. येथील डॉक्टरांनी काय चुकीचे केले असेल, तर त्यांची तक्रार करता आली असती. तक्रार करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. परंतु अशा पद्धतीने वर्तणूक करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
.....................................
डॉक्टर सामूहिक राजीनामा देणार
कामथे रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र हा विषय गांभीर्याने घेतला आहे. या मारहाणीचा निषेध करत थेट सामूहिक राजीनामे देण्याची तयारी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेनंतर दोन डॉक्टरांनी राजीनामे डॉ. सानप यांच्याकडे दिले आहेत. मात्र अनेकांनी याबाबत डॉक्टरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.