तब्बल दोन वर्षाच्या नोंदी रखडल्या
By admin | Published: June 7, 2015 12:47 AM2015-06-07T00:47:16+5:302015-06-07T00:47:16+5:30
सतीश शेवडे : ग्राम रोजगार सेवकांबद्दल तीव्र संताप
रत्नागिरी : मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेचे दोन वर्षाचे हजेरीपत्रक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांबद्दल आज (शनिवारी) झालेल्या जिल्हा परिषद कृषी समितीत संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी तिन्ही वर्षांचे हजेरी पत्रक भरण्याच्या सूचना ग्राम रोजगार सेवकांना दिली.
आजची कृषी समितीची सभा उपाध्यक्ष शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू व इतर झाडांची लागवड करण्यात येते. ही लागवड मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. या योजनेचे मस्टर भरण्यासाठी ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती मनरेगाअंतर्गत करण्यात आली आहे. फळबाग लागवड योजनेचे ग्राम रोजगार सेवक केवळ एकाच वर्षाचे मस्टर भरत आहेत. पुढील दोन वर्षांचे मस्टर भरण्यास ते विरोध करीत आहेत. केवळ एकाच वर्षाचे मस्टर भरले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात या सेवकांबद्दल असंतोष पसरलेला आहे. आज या विषयावर कृषी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली. उपाध्यक्ष शेवडे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उर्वरित दोन्ही वर्षांचे मस्टर भरण्याची सूचना उपाध्यक्ष शेवडे यांनी दिली. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
खरीब हंगामासाठी खते, बियाणी तालुका पातळीवर खरेदी-विक्री संघात ठेवण्यात आली आहेत. याबाबत कोणाची तक्रार असल्यास कृषी विकास अधिकारी आणि उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करावी, असे उपाध्यक्ष शेवडे यांनी जाहीर केले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्यावरण दिन, पर्यावरण सप्ताह राबविण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येत आहेत. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही शेवडे यांनी केले. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येत आहेत. शेतकरी याचा लाभ घेताना दिसत नाहीत. मात्र, आता तो घेतला जावा, यासाठी कृषी विभागातर्फे सध्या जोरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली. (शहर वार्ताहर)