तुंबाड येथे नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By मनोज मुळ्ये | Published: May 20, 2024 08:33 PM2024-05-20T20:33:25+5:302024-05-20T20:33:35+5:30

मासेमारी करणाऱ्याने तिघांना वाचवले

Two youths drowned in the river at Tuband | तुंबाड येथे नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

तुंबाड येथे नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

खेड : तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेले पाच जण बुडाल्याची घटना सोमवार, २० मे रोजी घडली. यातील तिघांना वाचविण्यात यश आले असून, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (१९, रा. पन्हाळजे, ता. खेड ) व अंकेश संतोष भागणे (२०, रा. मधली वाडी, बहिरवली, ता. खेड) अशी या मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ आणि अंकेश यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड येथील जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते. नेमकी ती वेळ भरतीची असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले.

तेथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने ही घटना बघितली आणि त्यातील तिघांना वाचवले. परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता, तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता. सुटीनिमित्त तो गावी आला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या दोघांची अधिक माहिती मिळू शकली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे - बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

नवख्या ठिकाणी काळजी घ्या
उन्हाळी सुट्टीमुळे परगावाहून अनेकजण येथे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आले आहेत. परंतु नवख्या ठिकाणी आल्यानंतर नदीच्या प्रवाह, नदीची खोली यासंदर्भात अधिक माहिती नसल्यास पोहताना काळजी घ्या, असे आवाहन खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.

Web Title: Two youths drowned in the river at Tuband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.