सत्ताधाऱ्यांमध्येच ‘झोंबाझोंबी’चे प्रकार
By admin | Published: May 18, 2016 11:03 PM2016-05-18T23:03:22+5:302016-05-19T00:15:19+5:30
दोन माजी सभापतींमध्ये कलगीतुरा : पत्रिकेवर नसणाऱ्या विषयावरच रणकंदन
चिपळूण : मार्च महिन्यात झालेल्या ठरावावर इतिवृत्त मंजुरीच्यावेळी माजी सभापती संतोष चव्हाण व माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक झोंबाझोंबी झाली. सेसच्या कामावरुन मार्च महिन्यात ठराव झाला होता. त्यानंतर चिवेली येथे झालेल्या मासिक सभेत त्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. असे असतानाही त्याच विषयावर पुन्हा चव्हाण यांनी चर्चा सुरु केल्याने माजी सभापती जितेंद्र चव्हाण व सदस्य दिलीप मोरे यांनी जोरदार आक्षेप घेतला. दोन माजी सभापतींमध्ये कलगीतुरा रंगला असताना सभापती स्नेहा मेस्त्री यांनी मात्र सक्षमपणे हा विषय हाताळला.
चव्हाण यांनी सेसमधून केलेल्या कामाबाबत मार्च महिन्याच्या मासिक सभेत ठराव झाला होता. हा ठराव करताना आपले मत जाणून घ्यायला हवे होते. त्यामुळे असा ठराव करता येत नाही, असे चव्हाण यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर जितेंद्र चव्हाण व दिलीप मोरे यांनी जोरदार हल्ला चढवला. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर असा ठराव होऊ शकतो. तसेच या सभेचे इतिवृत्त चिवेली येथे मंजूर झाले आहे. आता विषय पत्रिकेवर विषय नसल्याने त्यावर चर्चा नको. सभागृहाचा वेळ वाया घालवू नका, असे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी संतोष चव्हाण व जितेंद्र चव्हाण हे दोघेही आक्रमक झाले होते. यावेळी दोघांमध्ये ‘तू तू मैं मैं’ झाले. यावेळी दिलीप मोरे यांनी जितेंद्र चव्हाण यांना साथ केली. अखेर या विषयावर आयत्यावेळीच्या विषयात चर्चा केली जाईल असे सांगताच सभागृह शांत झाले. इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर कार्यवाहीवर चर्चा झाली. त्यानंतर विकासकामांना मंजुरी देण्याचा ठराव आला असता, संतोष चव्हाण यांनी पुन्हा मुद्दा उकरुन काढला. यावेळी सभापती मेस्त्री यांनी चव्हाण यांना ही कामे समाजकल्याणमधील आहेत, असे सुनावले. या कामांना मंजुरी देताना त्यांना पैसे कुठून आणणार? असा सवाल माजी सभापती सुरेश खापले यांनी उपस्थित केला व प्रशासनाने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. यावरही जितेंद्र चव्हाण, दिलीप मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी खापले यांनी सांगितले की, माझा ठरावाला विरोध नाही. परंतु, वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडा. मी ठराव रद्द करा, असे म्हणालेलो नाही. असे असताना आपण असे का रियाक्ट होत आहात? खापले यांच्या मागणीवर आपण सभापती असताना कधी नियोजन केले नाही. आता कशाला सांगताय? पुढचे पुढे पाहता येईल. आता सर्व कामांना मंजुरी द्या, असा रेटा चव्हाण व मोरे यांनी लावला.
या विषयावर प्रशासनाला जबाबदार धरु नका. प्रशासनाचा काय संबंध? कोणती कामे करायची किंवा नाही हे सभागृह ठरवते. यावर चर्चा झाल्यानंतर कोळकेवाडी पठारवाडी, वीर शाळा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद व्हावी, असे खापले यांनी सांगितले. आत्ता मुद्याचे बोललात, असे सांगून चव्हाण व मोरे यांनी खापले यांची खिल्ली उडवली.
यानंतर सभागृह शांत झाले व विविध विषयांचा विभागवार आढावा घेण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाचा आढावा घेताना गुहागर - विजापूर या मार्गावर सामाजिक वनीकरणतर्फे झाडे लावली जात आहेत. मुळात हा रस्ता चौपदरीकरण होणार आहे. मग ही झाडे पुन्हा तोडावी लागतील. शासनाचा पैसा वाया जाईल त्याचे काय? कौंढरताम्हाणे परिसरात रस्त्यालगत असलेली झाडे लाकूड व्यापाऱ्यांनी तोडली. याबाबत आम्ही तक्रार केली त्याचे काय झाले? त्यांच्यावर कारवाई कोण करणार? आपण झाडे लावायची आणि व्यापाऱ्यांनी तोडून न्यायची हे बरोबर नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उपसभापती नंदकिशोर शिर्के यांनीही त्याला दुजोरा दिला. शेवटी उपसभापती शिर्के यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)