रोपवाटिकेचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:17+5:302021-05-27T04:33:17+5:30
गादी वाफा पद्धत रोपवाटिकेसाठी पूर्व मशागत केलेल्या क्षेत्रामध्ये तळाशी १२० सेंटिमीटर व पृष्ठभागी ९० सेंटिमीटर रुंदीचे, ८ ते १० ...

रोपवाटिकेचे प्रकार
गादी वाफा पद्धत
रोपवाटिकेसाठी पूर्व मशागत केलेल्या क्षेत्रामध्ये तळाशी १२० सेंटिमीटर व पृष्ठभागी ९० सेंटिमीटर रुंदीचे, ८ ते १० सेंटिमीटर उंचीचे व जमिनीच्या उतारानुसार आवश्यक त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यासभोवती पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ३० ते ५० सेंटिमीटर रुंदीचे चर काढावेत. वाफ्यात प्रति गुंठा क्षेत्रास एक किलोग्रॅम युरिया किंवा २ किलाेग्रॅम अमाेनियम सल्फेट, ३ किलोग्रॅम सिंगल सुपर फाॅस्फेट व ८०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते मिसळावीत. नंतर वाफ्यावर रुंदीला समांतर सात ते आठ सेंटिमीटर अंतरावर ओळी काढून साधारणपणे २ सेंटिमीटर खोलीवर बी पेरावे व मातीने झाकून घ्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रतिगुंठा क्षेत्रास एक किलोग्रॅम युरिया खत द्यावे. गादीवाफ्यावर पेरणी केल्यामुळे मुळाजवळील जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे रोपे उपटण्यास सोपी पडतात. शिवाय ओळीत पेरणी केल्याने तणे काढणेसुद्धा सोपे होते.
बीज प्रक्रिया
बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी, जोमदार रोप निर्मितीसाठी तसेच रोग नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. परंतु, स्वत:कडील चांगल्या प्रतीचे भात बियाणे पेरणीसाठी वापरणार असाल तर बियाण्यांसाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रथमत: प्लास्टिकच्या बादलीमध्ये तीन टक्के मिठाचे द्रावण (३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाणी) तयार करावे. त्यात भाताचे बियाणे थोडे थोडे ओतावे. हलके, पोचट, कीडग्रस्त बियाणे तसेच काडीकचरा पाण्यावर तरंगेल. तो हाताने बाजूला काढावा. नंतर तळाशी राहिलेले बियाणे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवावे व २४ तास सावळीत वाळवावे. बियाणे सुकल्यानंतर त्यास प्रती किलोला २ ते ३ ग्रॅम याप्रमाणे थायरम, इमिसान किंवा कार्बेन्डॅझीम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक चोळावे. यामुळे बुरशीजन्य रोगाचा बंदोबस्त होईल.
भात जातीची निवड
जमिनीच्या प्रकारानुसार हळव्या, गरव्या, निमगरव्या जातीची निवड करावी. भात तयार होण्यास लागणाऱ्या कालावधीनुसार जातीची निवड करावी. जमिनीच्या प्रकारानुसार जातीची निवड करावी. तसेच दाण्याच्या प्रकारानुसार बारीक किंवा जाड दाण्याच्या जातीची निवड करता येईल.
हेक्टरी बियाणे
जाड दाण्याच्या जातींच्या बाबतीत प्रति हेक्टरी ५० किलो आणि बारीक दाण्याच्या जातींच्या बाबतीत ४० किलो बियाणे वापरावे, तर संकरित जातीसाठी हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. लागवड करावयाच्या एक दशांश क्षेत्र रोपवाटिकेसाठी लागते. एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करायची असेल तर दहा गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी लागेल.