सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे उद्या तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:09 PM2019-07-03T12:09:23+5:302019-07-03T12:12:48+5:30
जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे. यावेळी ३ ते ४ मीटर उंचीच्या सागरी लाटा मिऱ्या किनाऱ्याला धडकणार आहेत. त्यामुळे सागराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट पसरली आहे.
रत्नागिरी : जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे. यावेळी ३ ते ४ मीटर उंचीच्या सागरी लाटा मिऱ्या किनाऱ्याला धडकणार आहेत. त्यामुळे सागराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट पसरली आहे.
गेल्या ४ दशकांच्या काळात मिऱ्या गावाच्या सागरी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. प्रतिबंधासाठी दगडी बंधारावजा भिंत उभारण्यात आली. परंतु ती योग्य निकष न पाळल्याने सातत्याने कोसळत आहे.
करोडो रुपये या धूपबंधाऱ्यावर खर्च करण्यात आले आहेत. तरीही मिऱ्या गावाला सागरापासून असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे आता मिऱ्यामध्ये टेट्रापॉड धर्तीवरील धूपप्रतिबंधक बंधारा उभारला जाणार आहे. मात्र, हा बंधारा पावसाळ्यात उभारला जाऊ शकत नाही. त्यामुळे तातडीची दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले. परंतु त्यासाठीही संबंधित विभागाकडे पैसेच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती झाली नाही.
आता गुरुवारी रत्नागिरीत सागराला दुपारी १२.३७ वाजता उधाणाची भरती येणार आहे. पावसाळ्यातील या उधाणाच्या भरतीच्या वेळी जोरदार वाऱ्यांमुळे उंच लाटा मिऱ्या किनाऱ्यावर धडकण्याची भीती आहे.