रत्नागिरीतील हौशी रेल्वेप्रेमी; २३ व्या नव्या गाड्यांच्या पहिल्या फेरीचे 'ते' एकमेव मानकरी
By शोभना कांबळे | Published: June 29, 2023 04:51 PM2023-06-29T16:51:32+5:302023-06-29T16:53:39+5:30
१९९६ सालापासून रत्नागिरीतून पुढे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील नव्या ट्रेनमधून प्रवास
शोभना कांबळे
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, हाैशी रेल्वेप्रेमी उदय बाेडस यांनी कोकण मार्गावरील २३ व्या नव्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मधून प्रवास करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. बुधवारी त्यांनी या रेल्वेतून सपत्निक पहिला व्यावसायिक प्रवास केला.
प्रा. उदय बोडस कोकण रेल्वे मार्गावर १९९६ सालापासून आतापर्यंत रत्नागिरीतून गेलेल्या २२ नव्या गाड्यांचा पहिला व्यावसायिक प्रवास करणारे एकमेव प्रवासी आहेत. २ जून रोजी वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन फेरीच्या प्रवासाला आवश्यक तो पास त्यांनी मिळवला होता. पण दुर्दैवाने ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर या सोहळ्याची तारीख २७ जून जाहीर करण्यात आली होती.
मात्र, मंगळवार, दि. २७ रोजी मडगाव येथून उदघाटन होऊन निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सहभागी न होता उदय बोडस यांनी बुधवार २८ जून रोजी रत्नागिरी - मडगाव असा या नव्या रेल्वेतून प्रवास केला. सकाळी मुसळधार पावसात उदय बोडस आणि त्यांची पत्नी साधना बोडस रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकावर पोहोचले. १७ डब्यांची ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रत्नागिरीकडे येत असताना तिचे आधुनिक रूप विलोभनीय दिसत असल्याचे प्रा. बोडस यांनी सांगितले. रत्नागिरीत ही ट्रेन निर्धारित वेळेआधीच पोहोचली. रत्नागिरीत येण्याची वेळ सकाळी १०:४० असतानाच या ट्रेनचे आगमन १०: ३५ ला झाले. यातून दहा प्रवासी रत्नागिरीत आले. तर बोडस दांपत्याबरोबरच रत्नागिरीतून सुमारे १८ ते २० प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करणारे होते. ही ट्रेन १०:४५ वाजता रत्नागिरीतून मडगावकडे मार्गस्थ झाली.
या व्यावसायिक उद्घाटन फेरीच्या २३ व्या प्रवासाचे तिकीट २१०० पेक्षा जास्त असून पहिल्या ३ मिनिटात ५३० पैकी १४१ तिकीटे आरक्षित करण्यात आली. या ट्रेनमध्ये बोडस दांपत्याने भोजनाचाही आनंद घेतला. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उदघाटनाचा मुहुर्त हुकला असला तरी उदय बोउस यांनी या गाडीतून पहिल्या व्यावसायिक प्रवासाचा संकल्प अखेर बुधवारी पूर्ण केला.
उदय बोडस यांनी १९९६ सालापासून रत्नागिरीतून पुढे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील नव्या २२ ट्रेनमधून आतापर्यंत प्रवास केला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही २३ वी ट्रेन आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये पहिल्याच कोचमध्ये त्यांचा आणि पत्नीचा आसनक्रमांक २३ आणि २४ असा होता.