जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी उदय बने बिनविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:57+5:302021-04-06T04:30:57+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उदय बने यांच्या वतीने राेहन बने यांनी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज ...
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उदय बने यांच्या वतीने राेहन बने यांनी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. (छाया : तन्मय दाते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या तडजाेडीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी डाॅ. विकास सूर्यवंशी यांनी उदय बने यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, उदय बने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच ही निवडणूक पार पडली.
शिवसेनेचे पूर्ण बहुमत असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पदांसाठी सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला हाेता. त्यानुसार राेहन बने यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला हाेता. त्यांच्यानंतर या पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांची नावे चर्चेत हाेती. अध्यक्षपदासाठी उदय बने प्रबळ दावेदार मानले जात असतानाच महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला पाळत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत जाधव यांना अध्यक्षपद तर उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले हाेते. उपाध्यक्षपद देताना कृषी विभाग काढून त्याऐवजी आराेग्य व बांधकाम समिती देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याला उदय बने यांनी सहमती दर्शविल्याने उपाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले हाेते. साेमवारी केवळ त्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. विकास सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत साेमवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित हाेते.
उदय बने यांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राेहन बने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उदय बने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
चाैकट
प्रथमच समितीची अदलाबदल
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ८३ अन्वये उपाध्यक्षांना विषय समितीचे प्रभारी अधिकार दिल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच समितींची अदलाबदल करण्यात आली. ही अदलाबदल करताना उपाध्यक्षांकडील कृषी विभाग काढून त्याऐवजी आरोग्य व बांधकाम समिती सोपवण्यात आली आहे.