उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश
By मनोज मुळ्ये | Published: August 9, 2022 01:02 PM2022-08-09T13:02:19+5:302022-08-09T13:09:28+5:30
२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : सन २००४ पासून तब्बल अठरा वर्षे सलग रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकदा राज्यमंत्री तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आता दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते प्रथम प्रकाशझोतात आले. २००४ साली वयाच्या २९व्या वर्षी त्यांनी विद्यमान भाजप आमदाराचा पराभव करुन प्रथम विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. त्या टर्ममध्ये २०१३ साली ते नगरविकास, बंदरे, वने अशा नऊ खात्यांचे राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री झाले.
२०१४ साली विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आधीपेक्षा वाढीव मताधिक्याने विजयी झाले. २०१४ ते २०१९ या काळात मंत्रिपद नसले तरी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. २०१६ साली ते विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष होते., २०१८ साली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला एकापेक्षा अधिकवेळा भेट दिली आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हे कॅबिनेट मंत्रिपद देतानाच त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयालाही सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच रामटेकच्या कवि कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर उदय सामंत यांनी त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आमदारकी आणि मंत्रिपदाचा अनुभव लक्षात घेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती आणि तसेच घडले.