Uday Samant: रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा
By रहिम दलाल | Published: September 18, 2022 02:05 PM2022-09-18T14:05:28+5:302022-09-18T14:06:09+5:30
Uday Samant: ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
- रहिम दलाल
रत्नागिरी : ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वाडिया हॉस्पिटल आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयात लहान मुलांची मोफत २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनानिमित्ताने ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मजगाव रोड येथील रुग्णालयाच्या इमारतीमधील जागा या रुग्णालयासाठी वापरायला देण्यास रत्नागिरी नगर परिषद तयार आहे. जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील माणूस यांच्यावर पैशामुळे उपचार होत नाहीत अशी मानसिकता निर्माण झाली आहे. ती देखील दूर करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळणार आहे. असे उदगार सामंत यांनी काढले. आईच्या पोटात असलेल्या बाळाला हृदय रोग असेल तर कुठचीही शस्त्रक्रिया न करता त्या बाळाला बरे करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशामध्ये पहिल्यांदा करणार आहेत. म्हणून आम्ही त्यांचे चाहते आहोत. खोके, ओके वगैरे जाऊ देत, असेही त्यांनी स्पष्ट केले.