उदय सामंत यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 04:46 PM2018-02-17T16:46:45+5:302018-02-17T16:48:13+5:30
संगणक परिचालकांचे रखडलेल्या मानधनासाठी आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले
रत्नागिरी : संगणक परिचालकांचे रखडलेल्या मानधनासाठी आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिद तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरचे अधिकारी यांनाही यावेळी चांगलेच फटकारण्यात आले़ आजच्या आज संगणक परिचालकांचे मानधन आणि ग्रामपंचायतींचे २४ लाख रुपये परत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा आमदार सामंत यांनी दिला़ कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा परिषदेला दिली.
जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्रे सुरु असून, त्यामध्ये ५३७ संगणक परिचालक कार्यरत आहेत़ त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींमध्ये ६७ संगणक परिचालक आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये काम करीत आहेत़ आपले सरकारसाठी ग्रामपंचायती दरमहा १२ हजार रुपये कॉमन सर्व्हिस सेंटर या शासननियुक्त कंपनीला देतात़ त्यातून संगणक परिचालकांना ६ हजार रुपये आणि या केंद्रासाठी लागणाऱ्या स्टेशनरीसाठी २७०० रुपये देण्याचे शासनाने या कपंनीला ठरवून दिले आहेत़ मात्र, कंपनीने शासनाने दिलेले नियम, अटी सर्व धाब्यावर बसविले जात आहेत़ त्याच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून अंकुश राहिलेला नाही.
संगणक परिचालकांना गेले सहा महिने ते वर्षभर मानधन दिलेले नाही़ त्याचबरोबर ग्रामपंचायतींकडून स्टेशनरीसाठी पैसे घेऊनही ती दिली गेलेली नाही़ संगणक परिचालकांनी मानधनासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र कंपनीकडून धुळफेक केली जात आहे. या कंपनीकडून ग्रामपंचायतींनाही वेठीस धरले जात असल्याचे लक्षात आल्याने आमदार सामंत यांनी यामध्ये लक्ष घातले.
जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यापूर्वी आमदार सामंत यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून समज दिली होती़ तरीही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पैसे जमा केलेले नाही़ त्यामुळे आमदार सामंत यांच्या नेतृत्वाखाली संगणक परिचालकांनी आज शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले़ यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती आण्णा कदम, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, बाबू म्हाप, रोहन बने, सदस्या रचना महाडीक, रजनी चिंगळे, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, पंचायत समिती सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमध्ये आमदार सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन करीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कंपनीचे अधिकारी समशेर खान यांना तात्काळ बोलावून घेतले़ आमदार सामंत यांनी आपले सरकारमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी सूचना त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली़ त्याचवेळी स्टेशनरीच्या नावाखाली ग्रामपंचायतींची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत आतापर्यंत किती स्टेशनरी दिलीत, असा जाब कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार सामंत यांनी विचारला़ त्याच वेळी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केवळ एकदाच रिकामा टोनर देण्यात आला़ उलट स्टेशनरीचा खर्चही ग्रामपंचायतींना करावा लागतो, असे स्पष्ट केले़ त्यावेळी संतप्त आमदार सामंत आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींकडून जमा केलेले २५ लाख रुपये आजच्या आज ग्रामपंचायतींकडे जमा करा, अशी सूचना केली.
आमदार सामंतांनी सुमारे ४ तास ठिय्या आंदोलन करीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़ यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सीद यांच्यावर कंपनीचे एजंट असल्याचाही आरोप केला़ यावेळी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी संतप्त झाले होते. अखेर कंपनीच्या अधिकाºयांने सायंकाळपर्यंत ग्रामपंचायतींचे पैसे परत करतो, असे स्पष्ट मान्य केले.
लोकप्रतिनिधींवर कारवाई करा?
संगणक परिचालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, अशा प्रकारचे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पोलिसांना दिले होते़ त्यावर संतप्त होऊन आमदार सामंत यांनी सीद यांना चांगलेच फैलावर घेतले होते़ त्यावेळी वातावरण संतप्त झाले होते.
कंपनीला अडवणाऱ्या ग्रामसेवकावरच कारवाई
संगणक परिचालकांचे मानधन दिले जात नसल्याने तसेच ग्रामपंचायतींना स्टेशनरी दिलेली नसल्याने सरपंचांनी कंपनीचा देण्यात येणारे १२ हजार रुपये थांबविले होते़ त्यावर सरपंचाना अपात्र करणेची कारवाई करणेत येईल तसेच ग्रामसेवकांवरही कारवाई करण्याची रत्नागिरी गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र पाठविले होते़ त्यावर आमदार सामंतांनी चुकीच्या पध्दतीने नोटीस देणाºयावर कारवाई करावी, अशी सूचना दिली़ त्यानंतर हे पत्र अवधानाने दिले असून चुकीचे असल्याचे अधिकाºयांनी मान्य केले.