Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 03:56 PM2022-08-07T15:56:00+5:302022-08-07T15:57:34+5:30
Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत
मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टिका केली जात आहे. तर, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच हा शब्द घेऊन या प्रश्नावर निश्चित उत्तर देण्याचं टाळत आहेत. आता, शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनीही मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे म्हटले. तसेच, ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते नाराज होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी मंत्री मंडळ विस्ताराची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधक आम्हाला हिणवत आहेत. परंतु, सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केसचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. येत्या काही कालावधीतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे उदय सामंत यांनी रत्नागिरीत आपल्या पाली येथील निवास्थानी बोलताना सांगितले.
ज्यावेळी मंत्री मंडळाचा विस्तार होत असतो, त्यावेळी प्रत्येकाला आपण मंत्री व्हावे असे वाटत असते. पण, आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जो विस्तार करतील, ज्यांच्यावर जी जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू. ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही तेही नाराज न होता काम करतील. कारण, आम्ही शिंदे समर्थक आहोत, असे सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना सांगितले.
मा. दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत.. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. अफवांवर विश्वास ठेवू नये.
— Uday Samant (@samant_uday) August 6, 2022
वैयक्तिक टीका टिपण्णी नको
दरम्यान, दीपक केसरकर यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले युतीमध्ये काम करत असताना वैयक्तिक टीका टिपण्णी करणे हे दोन्ही बाजुने योग्य नाही. दीपक केसरकर हे चांगले प्रवक्ते आहेत. तसेच युतीचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते परिपक्व आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. परंतु, वैयक्तिक टीका टिप्पणी करणे, दोन्ही बाजूने थांबले पाहिजे असा सल्लादेखील सामंत यांनी राणे व केसरकर वादावर बोलताना दिला आहे.
याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होतोय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघांनी नकार दिला. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.