बसस्थानक कामाला गती न आल्यास कारवाई- उदय सामंत यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:38 PM2020-01-13T13:38:54+5:302020-01-13T13:41:22+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, ...
रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, महिना, दीड महिन्यात कामाबाबत प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी एस. टी. बस स्थानकाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रेंगाळलेल्या बसस्थानकाच्या कामाबाबत प्रवासी व जनतेतून वारंवार तक्रारी येत असल्याने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी बसस्थानकाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच एस. टी. महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, विभाग नियंत्रक सुनील भोकरे, सहाय्यक विभागीय वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला शहर संघटक मनीषा बामणे आदी उपस्थित होते.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला विविध कारणांनी विलंब झाला आहे. यापुढील काळात तसे होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी केली. बसस्थानकाच्या कामामुळे नागरिक आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी स्थानकासमोर मुख्य मार्गावर उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
यासाठी लगेच दुसऱ्या ठिकाणावरुन बस सुटतील, याची व्यवस्था करा, त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित देण्याचे आश्वासन दिले. एक ते दीड महिना कालावधीत बांधकाम प्रगतीपथावर दिसले नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बसस्थानकाच्या सुरू असलेल्या कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची सूचना केली. त्यासाठी मान्यताही दर्शविण्यात आली. त्यामुळे आता या कामाला अधिक गती येण्याची अपेक्षा केली जात आहे.
जिल्हाधिकारी यांनी घेतली तातडीने बैठक
कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली व विविध विभागांना सूचना दिल्या. या बैठकीला कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, तहसीलदार शशिकांत जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते.