उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

By मनोज मुळ्ये | Published: October 22, 2023 12:07 PM2023-10-22T12:07:05+5:302023-10-22T12:07:48+5:30

सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले.

Uday Samant's courtship is successful, resignation of Shiv Sena office-bearers back | उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून राजीनामे देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी केलेली चर्चा यशस्वी झाली आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मागे घेतले.

मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी तेथील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. प्रत्यक्षात ती कारवाई सुरू झाल्यानंतर मच्छीमारांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. हा प्रकार घडल्यानंतर विरोधकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. अतिक्रमण हटवण्याचे सर्व खापर विरोधकांनी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर फोडले होते. या प्रकारामुळे मुस्लिम समाज उदय सामंत यांना साथ देणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात होता.

दरम्यान शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर रात्री मंत्री उदय सामंत तसेच उद्योजक किरण सामंत यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष इम्रान मुकादम आणि सर्व सहकारी यांनी झालेला प्रकार हा गैरसमजुतीतून असल्याचे कबूल केले आणि आपण सर्व मच्छिमार उदय सामंत यांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. आपण सर्वजण आपले राजीनामे मागे घेऊन पुन्हा एकदा सामंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहू, अशी ग्वाही यावेळी सर्व मच्छीमारांनी दिली.

मिरकरवाडा येथे मच्छीमारांसाठी सुसज्ज अशी इमारत बांधून त्या ठिकाणी काम करणाऱ्या मच्छीमारांना गाडी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच खोकेधारकांना गाळे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

यावेळी किरण सामंत,अपर जिल्हाधिकारी बर्गे, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम मात्रे, आनंद पालव, तसेच मत्सविभागाचे अधिकारी, आणि जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, निमेश नायर, इम्रान मुकादम, नुरा पटेल, उबेद होडेकर, सुहेल साखरकर, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, शकील डिंगणकर, व शेकडो मच्छिमार बांधव उपस्थित होते.

Web Title: Uday Samant's courtship is successful, resignation of Shiv Sena office-bearers back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.