रत्नागिरी जिल्ह्यात उद्धवसेनेला घरघर, शिंदेसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:33 IST2025-03-07T15:31:56+5:302025-03-07T15:33:03+5:30
रत्नागिरी : ढासळत जाणारा बालेकिल्ला सावरण्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने उद्धवसेनेतील एक एक नेता, पदाधिकारी शिंदेसेनेच्या वाटेवर जात आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यात उद्धवसेनेला घरघर, शिंदेसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठे यश
रत्नागिरी : ढासळत जाणारा बालेकिल्ला सावरण्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने उद्धवसेनेतील एक एक नेता, पदाधिकारी शिंदेसेनेच्या वाटेवर जात आहे. शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगर मोहिमेला जिल्ह्यात मोठे यश आले आहे. राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वरनंतर आता दापोलीत ही मोहीम जोर धरत आहे. तेथील नगर पंचायती आता शिंदेसेनेच्या ताब्यात जाईल. तेथे उद्धवसेनेचा किल्ला लढवणारे माजी आ. संजय कदम हेही आता शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत.
ज्यावेळी शिवसेनेचे दोन भाग झाले, तेव्हा प्रथम रत्नागिरीचे आ. उदय सामंत आणि त्यांच्यानंतर दापोलीचे आ. योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. तेव्हाचे अन्य दोन आ. राजन साळवी आणि भास्कर जाधव उद्धव सेनेतच राहिले. त्यामुळे जिल्ह्यात शिंदेसेनेला कितपत यश मिळेल, याबाबत तेव्हा शंका व्यक्त केली जात होती. उद्धवसेनेतील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते काठावर होते. नेमक्या कोणत्या बाजूला जायचे, याबाबत त्यांचा संभ्रम होता. शिंदे यांचे बंड किती काळ टिकेल, त्याला पुढे किती यश येईल, याची शाश्वती तेव्हा अनेकांना नव्हती.
या बंडानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाला यश मिळेल, तिकडे कार्यकर्ते जाणार, हे साधारण गणित होते. लोकसभेत शिंदेसेनेला उद्धवसेनेपेक्षा अधिक यश मिळाले नाही. त्यामुळे काठावरचे लोक तेथेच राहिले. पण विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेने उद्धवसेनेवर मोठी मात केली. राज्यात उद्धवसेनेपेक्षा तिप्पट जागा शिंदेसेनेला मिळाल्या. त्यामुळे शिंदेसेना सत्तेत गेली. त्यामुळे शिंदेसेना अधिक उजवी झाली. ही स्थिती आणखी मजबूत होणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले. आता उद्धवसेना सत्तेत येणे अवघड आहे, हे लक्षात आल्याने अनेकांनी उद्धवसेना सोडून शिंदेसेनेची वाट धरली.
उद्धवसेनेला मोठे धक्के
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राजन साळवी, माजी आ. सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांचे पक्ष सोडणे उद्धवसेनेसाठी मोठे धक्के आहेत.