ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बारसूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास..; आमदार राजन साळवींचा इशारा
By मनोज मुळ्ये | Published: May 2, 2023 04:45 PM2023-05-02T16:45:29+5:302023-05-02T17:10:02+5:30
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका मान्य
रत्नागिरी : ज्या पक्षामुळे नारायण राणे यांना मानसन्मान मिळाला. ज्या पक्षामुळे राणे आणि त्यांच्या मुलांमध्ये बोलण्याची धमक आली, त्या पक्षाच्या प्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना अडवण्याची भाषा त्यांनी करु नये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसूमध्ये येऊन ग्रामस्थांशी बोलतील. त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिला.
रत्नागिरीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार साळवी यांनी ही भूमिका मांडली. रिफायनरी प्रकल्पाला आपण समर्थन केले असले तरी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका आपल्याला मान्य असेल, हे आपण याआधीच स्पष्ट केले आहे. तीच भूमिका आपली कायम आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना आमदार साळवी यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. नारायण राणे यांना शिवसेनेमुळेच मानसन्मान मिळाला. शिवसेनेने बाळकडू दिले म्हणूनच राणे आणि त्यांच्या मुलांमध्ये बोलण्याची धमक आली आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना अडवण्याची भाषा करु नये. त्यांना आधी आमच्याशी संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी नारायण राणे यांना दिला.
उद्धव ठाकरे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी येणारच
जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही ठाकरे यांचा दौरा होत आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले की, नियमांची काळजी प्रशासनाने घ्यावी. उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी येणारच. त्यांचा दौरा रद्द होणार नाही.
उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील, ती मान्यच
आमदार साळवी यांनी रिफायनरीचे समर्थन केले आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, रोजगाराचा विचार करुन मी या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी आपली भूमिका आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्यच असेल.
त्याबाबत आपली नाराजी
ग्रामस्थांनी आंदोलन करुनही स्थानिक आमदार म्हणून आपण तेथे गेला नाहीत, अशी लोकांची भावना होती, असा प्रश्न करण्यात आला असता आमदार साळवी म्हणाले की, माझे या प्रकल्पाला समर्थन असल्याने तेथे गेलो नव्हतो. मात्र बारसूमध्ये लोकांवर जबरदस्ती करण्यात आली आहे. त्याबाबत आपली नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याप्रसंगी आपण तेथे जाणार असल्याचेही ते म्हणाले.
ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बासूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास...; आमदार राजन साळवींचा इशारा#RajanSalvi#Barsupic.twitter.com/sLkzazSHbl
— Lokmat (@lokmat) May 2, 2023