रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई

By मनोज मुळ्ये | Published: May 23, 2024 05:18 PM2024-05-23T17:18:23+5:302024-05-23T17:18:41+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून, त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात येत आहे, अशी सूचना ...

Unauthorized entry is strictly prohibited in dam restricted area in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई

रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून, त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात येत आहे, अशी सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली आहे. त्याचबराेबर नागरिकांनी नियम पाळून खबरदारी बाळगावी व सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सर्व धरणांचे जलाशय, नदीपात्र या ठिकाणी पाण्याची खोली, साचलेला गाळ इत्यादीमुळे पाण्यात उतरल्यास दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे सर्वच जलाशय, तलाव, नदी, नदीतील पाणीसाठे याठिकाणी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये. स्थानिक नदीपात्रालगतच्या स्थानिकांनी पर्यटकांना, बाहेरील नागरिकांना पर्यटन, करमणूक इ. कारणास्तव पाण्यात उतरण्यास मनाई करावी व संभाव्य दुर्घटनांबाबत सूचित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नदी नाल्यांवर एकूण ४६ लघुपाटबंधारे प्रकल्प व ३ मध्यम प्रकल्प धरणे बांधण्यात आली आहेत. त्यामध्ये नियमितपणे पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणांव्यतिरिक्त मृद व जलसंधारण खात्यामार्फतही अनेक स्थानिक नाल्यांवर लहान-लहान धरणे बांधण्यात येऊन, त्यामध्ये पाणीसाठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी व बावनदी या नद्यांना पावसाळी हंगामात पूर येतो. या कालावधीत वरच्या भागातील धरणांमुळे अथवा झऱ्यांमुळे त्या प्रवाहित राहतात. प्रवाहामध्ये असल्याने नदीपात्रातच स्थानिक पाणीसाठे तयार होतात. त्यामुळे धरणाच्या जलाशयात अथवा नदीपात्रात पोहणे, जलक्रीडा, पर्यटन, करमणूक इ. सारख्या कारणास्तव नागरिकांनी, लहान मुले अनावधानाने गेल्याने दुर्घटना घडल्या आहेत. त्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई आहे. तसेच नदीपात्रात, काठावर अथवा जलाशयात ज्या शेतकऱ्यांचे पंपमोटर इ. साधने आहेत ती त्यांनी आताच काढून घ्यावीत, अशी सूचनाही गणेश सलगर यांनी केली आहे.

Web Title: Unauthorized entry is strictly prohibited in dam restricted area in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.