बेकायदा स्पिरीट वाहक टॅँकर जप्त
By admin | Published: May 17, 2016 01:31 AM2016-05-17T01:31:44+5:302016-05-17T01:46:25+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : स्पिरीटसह ३५ लाखांचा ऐवज हस्तगत
रत्नागिरी : इंधन वाहतुकीच्या नावाखाली स्पिरीटची वाहतूक करणारा टॅँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी विभागाने जप्त केला. सोमवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे येथे ही कारवाई करण्यात आली. या टॅँकरमध्ये प्रत्येकी पाच हजार लिटरचे सहा कप्पे असून, त्यात एकूण १० लाख ५० हजार किमतीचे ३० हजार लिटर स्पिरीट (मद्यार्क) आढळून आले. स्पिरीट व टॅँकरसह ३५ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क खात्याचे रत्नागिरी विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सोमवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. सोमवारी पहाटेच्या सुमारास अशोक लेलॅँड कंपनीचा केए १९ डी ६५७९ असा क्रमांक असलेला टॅँकर मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने तोंड करून बंद स्थितीत एका बाजूला असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच दोन पंच देवधे येथे दाखल झाले.
टॅँकरच्या केबिनचे दोन्ही दरवाजे उघडे होते. आत कोणीही नव्हते. ट्रकच्या क्रमांकाची खात्री केली असता तो दुचाकीचा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच चालक तेथे कोठेही आढळून आला नाही.