बेवारस मृतदेहाला मिळाले जबाबदार खांदे, रत्नागिरीत माणुसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:44 PM2020-12-10T13:44:47+5:302020-12-10T14:02:30+5:30
Social, Ratnagirinews, Hospital रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या प्रौढाचे उपचार सुरू असताना निधन झाले. गरीब कुटुंबातील असलेल्या व्यक्तीची पत्नी त्यांच्यासोबत होती. अन्य कोणीच नातेवाईक नव्हते. मृत व्यक्ती पोलादपूरची असल्याने अंत्यसंस्कारासाठी गावी नेणे अशक्य होते. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणी करावे, हा प्रश्न पुढे येताच संकल्प युनिक फाऊंडेशनने जबाबदारी घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या प्रौढाचे उपचार सुरू असताना निधन झाले. गरीब कुटुंबातील असलेल्या व्यक्तीची पत्नी त्यांच्यासोबत होती. अन्य कोणीच नातेवाईक नव्हते. मृत व्यक्ती पोलादपूरची असल्याने अंत्यसंस्कारासाठी गावी नेणे अशक्य होते. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणी करावे, हा प्रश्न पुढे येताच संकल्प युनिक फाऊंडेशनने जबाबदारी घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
संतोष काशीराम गोरे (३७) यांचे उपचार सुरू असतानाच सोमवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. सोबत त्यांची पत्नी होती, अन्य कोणतेही नातेवाईक नव्हते. मूळ गाव पोलादपूर, परंतु सध्या त्यांचे वास्तव्य पाली येथे होते. पोलादपूर येथून नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी येण्यास तयार नव्हते. मृत व्यक्ती कोरोनाग्रस्त नसल्याने तसा वैद्यकीय अहवालही जिल्हा शासकीय रुग्णालयातून देण्यात आला होता. परंतु तरीही कोणी यायला तयार नव्हते.
त्यामुळे मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला. ही बाब रमजान गोलंदाज यांनी संकल्प युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांना कळविली. कोंडकरी यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन आपली संस्था अंत्यसंस्कार करेल, असा विश्वास दर्शविला. ही संस्था सातत्याने अशा कार्यात पुढे आहे.
घेतली सगळी जबाबदारी
संस्थेचे सल्लागार, नगरसेवक सुहेल मुकादम यांनी ही जबाबदारी घेत संस्थेतर्फे मृतदेहावर बुधवारी सकाळी १० वाजता चर्मालय येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांच्या समवेत सुहेल मुकादम, शकील गवाणकर, रूपेश चव्हाण, नाझीम मजगावकर, आसीम इब्जी यांनी लाकडे वाहण्यापासून सरणावर प्रेत ठेवणे, यासाठी विशेष परिश्रम घेतले.