भोस्ते घाटात दगडांचे बेलगाम उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:50+5:302021-04-22T04:32:50+5:30

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत भोस्ते घाटात ब्रेकर यंत्रांचा वापर करून काळ्या दगडांचे बेलगाम उत्खनन सुरू असून, ...

Uncontrolled excavation of stones in Bhoste Ghat | भोस्ते घाटात दगडांचे बेलगाम उत्खनन

भोस्ते घाटात दगडांचे बेलगाम उत्खनन

Next

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत भोस्ते घाटात ब्रेकर यंत्रांचा वापर करून काळ्या दगडांचे बेलगाम उत्खनन सुरू असून, त्याकडे स्थानिक महसूल यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खेड तालुक्यात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदार मोठमोठी यंत्रसामुग्री वापरून काम करत आहे. मात्र, या महामार्ग चौपदरीकरण कामाच्या आड लपून महामार्गालगत मोठ्या प्रमाणात दगड व मातीचे उत्खनन होत आहे. शासनाला कोणत्याही प्रकारचे स्वामीत्व धन न भरता सुरू असलेल्या या उत्खननाकडे स्थानिक महसूल यंत्रणाही दुर्लक्ष करत आल्याचे दिसून येत आहे.

महामार्गावर कशेडी ते परशुराम या भागात भोस्ते व परशुराम हे दोन घाट आहेत. यापैकी भोस्ते घाटात मोठ्या प्रमाणात दगड असून, मोरवंडे, बोरज या परिसरात मोठ्या प्रमाणात मुरबाड माती आहे. या परिसरात अनेक ठिकाणी महामार्गासाठी संपादीत जागेपासून काही अंतरावर मोठ्या प्रमाणात माती व दगडांचे खासगी उत्खनन झालेले दिसत आहे. दगड अथवा मातीचे उत्खनन करून त्याचा व्यावसायिक वापर करायचा असल्यास शासनाला स्वामीत्व धन भरून रितसर रवानगी घ्यावी लागते. मात्र, भोस्ते घाट ते लोटे परिसरात मोठ्या प्रमाणात विना परवानगी उत्खनन होत असल्याचे दिसते. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. सर्वसामान्य माणसांना कायद्याचा बडगा उगारून दंड ठोठावणारी स्थानिक महसूल यंत्रणा या बड्या कंपन्यांकडे मात्र डोळेझाक करत आहे. याकडे शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: Uncontrolled excavation of stones in Bhoste Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.