रत्नागिरी जिल्ह्यातील १०९ गावांमध्ये पोहोचले घराघरात पाणी; ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ७६ टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:24 PM2023-09-18T13:24:50+5:302023-09-18T13:27:11+5:30
रत्नागिरी : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणीची प्रक्रिया १०९ गावांमध्ये पूर्ण करण्यात आली ...
रत्नागिरी : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणीची प्रक्रिया १०९ गावांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे, तर जिल्हाभरातील ३ लाख ३४ हजार ३६९ घरगुती नळजोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरगुती स्तरावर नळजोडणी देण्याचे ७६.३६ टक्के पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाद्वारे नियमित, शुद्ध आणि ५५ लिटर प्रति माणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जल जीवन मिशन’ची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे.
नियमित कामाचा आढावा
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून ‘जल जीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेवर पूर्ण व्हावीत, यासाठी नियमितपणे आढावाही घेण्याचे काम सुरू आहे.
९६५ योजना प्रगतिपथावर
‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात १,४७५ पैकी १,३४१ कामांना कार्यादेश देण्यात आलेली आहे. त्यापैकी ९६५ योजना प्रगतिपथावर आहे, तर २३६ योजनांची कामे १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून, १०९ गावांना या योजनेंतर्गत १०० टक्के नळजोडणी देण्यात आलेली आहे.
९१० कोटी अपेक्षित
मागणी नसलेल्या आणि जीवन प्राधिकरण विभागाकडे वर्ग केल्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १,३५५ योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी सुमारे ९१० कोटी रुपये निधी अपेक्षित आहे.
- एकूण घरगुती नळजोडण्या - ४,४९,६६७
- घरगुती नळजोडण्या पूर्ण - ३,३४,३६९
- काम पूर्ण - ७४.३६ टक्के
एकूण योजना - १,४७५
कार्यादेश दिलेल्या योजना- १,३५५
प्रगती पथावरील योजना- ९६५
भौतिकदृष्ट्या पूर्ण- २३६
नळजोडणी पूर्ण योजना- १०९
१०० टक्के नळजोडणी तालुके
तालुका - योजना
मंडणगड - १४
दापाेली - ३३
खेड - १४
गुहागर - ०१
चिपळूण - १६
संगमेश्वर - १२
लांजा - ०७
रत्नागिरी - ०७
राजापूर - ०५