मनरेगा अंतर्गत शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:39+5:302021-07-15T04:22:39+5:30
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील शाळा दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने शासकीय निधीची वाट न पाहता मनरेगा अंतर्गत शाळांची ...
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील शाळा दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने शासकीय निधीची वाट न पाहता मनरेगा अंतर्गत शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आढावा सभेमध्ये अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या राजापूर तालुक्याच्या आढावा सभेत विकास कामांवर जोरदार चर्चा झाली. झिरो पेंडसी व डेली डिस्पोजल बाबत शासन निर्णयानुसार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कामाची पध्दत अवलंबिली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांची कामे विहीत वेळेत पूर्ण करावीत. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून शासन निर्णयाप्रमाणे अटी व शर्तीनुसार जलजीवन मिशनची कामे पूर्ण करावीत. २५ लाखांच्या आतील कामे प्राधान्याने घेऊन त्यांची अंदाजपत्रके सादर करण्याची सूचना अध्यक्ष जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली.
मनरेगा अंतर्गत २६२ प्रकारची कामे घेण्यात येतात. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, शाळा दुरुस्ती, जनावरांसाठी गोठे बांधणे, बाजार कट्टे, बचत गट शेड आदी कामे घेण्यात यावीत. मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेऊन जास्तीत जास्त जॉब कार्ड बनविण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. तसेच ग्रामरोजगार सेवक नेमण्याचे आदेशही यावेळी अध्यक्षांनी दिले. क वर्ग पर्यटन व ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत पर्यटनस्थळ व यात्रास्थळांच्या विकासासाठी जास्तीत जास्त कामाचे प्रस्ताव जिल्हास्तरावर सादर करण्यात यावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा अध्यक्षांनी घेतला. लसीकरणाचा वेग वाढवून गावपातळीवर १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सन २०२१-२०४१ रस्ते विकास कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यांचा समावेश आराखड्यात करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या सूचना विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्याची सूचना अध्यक्षांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सभापती परशुराम कदम, चंद्रकांत मणचेकर, भारती सरवणकर, पंचायत समिती सभापती उन्नती वाघरे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, खातेप्रमुख व अन्य उपस्थित होते.
-------------------------------------------
राजापूर तालुक्याच्या आढावा सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे आमदार राजन साळवी यांनी स्वागत केले.