..म्हणून 'ति'ने पोटच्या लेकीला सोडले निर्जनस्थळी, मुलीची अवस्था पाहताच घेतली पाेलीस स्थानकात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:11 PM2022-01-29T12:11:05+5:302022-01-29T12:13:38+5:30
फाेटाेतील मुलीची अवस्था पाहून तिला अखेर पाझर फुटला. अखेर ती देवरुख पाेलीस स्थानकात स्वत:हून हजर झाली.
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील पऱ्याजवळील पुलाखाली चार दिवसांपूर्वी एक वर्षाची बालिका सापडली हाेती. त्याबाबत पाेलिसांनी साेशल मीडियावर बालिकेचा फाेटाे टाकून माहिती देण्याचे आवाहन केले हाेते. मुलीचा फाेटाे तिच्या आईपर्यंत पाेहाेचला आणि मुलीची अवस्था पाहून ती स्वत: देवरुख पोलीस स्थानकात शुक्रवारी हजर झाली.
देवरुख पाेलिसांनी सांची स्वरुप कांबळे (२६, रा. कुवारबाव बाजारपेठ, रत्नागिरी) आणि मिथिल उर्फ मिथिलेश मदन डांगे (२३, डांगेवाडी - हातखंबा, रत्नागिरी) या दाेघांना ताब्यात घेतले आहे. सांची हिला पहिला मुलगा असून, दुसरी मुलगी झाली. नवरा दारु पिणारा त्यात मुलीची जबाबदारी पडल्याने तिला ती नकुशी झाली हाेती. त्यानंतर तिने मिथिल याच्या साथीने या मुलीला संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील एका पुलाखाली निर्जनस्थळी ठेवले हाेते.
तर याप्रकरणी पाेलिसांनी हातखंबा येथून तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र, तिने मुलीला तिथे का ठेवले याचे कारण कळू शकलेले नाही. त्याचा शाेध देवरुख पाेलीस घेत आहेत. पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसांपूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्थळी सापडली हाेती. चार दिवस थंडीत राहिल्यामुळे तिचा आवाजही बसला हाेता. तेथील ग्रामस्थांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते.
पोलीस प्रशासनाकडून या मुलीच्या आईचा शोध सुरू हाेता. त्याचबराेबर पाेलिसांनी सोशल मीडियावर मुलीचा फोटो व तिच्या बद्दलची माहिती टाकली होती. जर कोणाला या मुलीविषयी किंवा तिच्या घरच्यांविषयी माहिती असल्यास तत्काळ देवरूख पोलीस, कंट्रोल रूम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले हाेते. साेशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट या मुलीच्या आईपर्यंत पाेहाेचली. त्या फाेटाेतील मुलीची अवस्था पाहून तिला अखेर पाझर फुटला. अखेर शुक्रवारी ती देवरुख पाेलीस स्थानकात स्वत:हून हजर झाली. अधिक तपास पाेलीस करत आहेत.
मुलीची प्रकृती ठणठणीत
निर्जनस्थळी सापडलेल्या मुलीला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. इवल्याशा मुलीला पाहून रुग्णालयातील कर्मचारीही गहिवरले. परिचारिकांनी तिला कवटाळून तातडीने उपचार सुरु केले. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु केले. या मुलीची प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.