लाॅकडाऊन काळात हार न मानता ते वळले पारंपरिक मच्छी विक्रीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:00+5:302021-05-08T04:33:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात अनेकांचे व्यवसाय - उद्योग ठप्प झाल्याने यशोशिखरावर असलेल्या व्यक्तींनाही नैराश्येने ग्रासून टाकले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात अनेकांचे व्यवसाय - उद्योग ठप्प झाल्याने यशोशिखरावर असलेल्या व्यक्तींनाही नैराश्येने ग्रासून टाकले होते. काहींना तर आत्महत्या हाच एकमेव उपाय, असे वाटत होते. मात्र, या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगरबत्तीची होणारी विक्री थांबली. तरीही न डगमगता रत्नागिरीनजीकच्या गयाळवाडी येथील अविनाश लाकडे १५ वर्षांनंतर आपल्या पारंपरिक मच्छी व्यवसायाकडे वळले आहेत. सध्या विविध मच्छीच्या घाऊक विक्री व्यवसायात कुठलीही लाज न बाळगता आई - वडिलांसह त्यांच्या सुविद्य पत्नी आणि वहिनी यांची साथ मोलाची ठरत आहे.
अविनाश यशवंत लाकडे यांचा गेली १५ वर्षे गयाळवाडी येथे आपल्या घरानजीकच अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. या अगरबत्यांची घाऊक विक्री अगदी देवगडपर्यंत सुरू होती. मात्र, गेल्या मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून लाॅकडाऊन झाले आणि व्यवसाय थांबला. घरात वृद्ध आई - वडील, पत्नी, दोन शाळकरी मुली, भाऊ, वहिनी आणि त्यांची छोटी मुलगी असा एकत्र परिवार. भाऊ मंगेश लाकडे फिनोलेक्स कंपनीत गेल्या काही वर्षांपासून अभियंता म्हणून कार्यरत, तर वहिनी वृषाली या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका. पण शैक्षणिक संस्थाही आतापर्यंत बंद आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भार एकट्या भावावर कसा द्यायचा, हा यक्षप्रश्न उभा राहिला. सतत डोक्यात हाच प्रश्न घोळू लागला आणि थोड्याच दिवसात मार्ग सापडला... मच्छीच्या घाऊक विक्री व्यवसायाचा.
नव्या उमेदीने लाकडे कुटुंबाने एकत्र विचार करून तत्काळ अविनाश लाकडे यांच्या निर्णयाला सहमती दर्शवली आणि सगळ्यांनीच सहकार्याचा हात पुढे केला. लाकडे परिवार मूळचा रत्नागिरीतील वरवडे गावचा. गावी काकांच्या मच्छिमारी नाैका असल्याने त्यांचेही सहकार्य मिळाले. यातून व्यवसाय सुरू केला. मुख्य रस्त्यावर गयाळवाडी येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व्यवसायाला सुरुवात केली. सध्या अत्यावश्यक दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची मुभा आहे. या काळात अविनाश लाकडे आणि त्यांची पत्नी आणि वहिनी मच्छी विक्री करत असतात. त्यासाठी लाकडे यांना सकाळीच शहरानजीकच्या जेटीवर पहाटे साडेचार - पाच वाजता उपस्थित राहावे लागते. व्यवसाय करतानाच कोरोनाविषयक सर्व ती काळजी घेतली जातेय, हे सांगायला नकोच. बंधू मंगेश यांचीही नोकरी व्यवस्थित सुरू आहे. त्यांची आई घरी अपूर्वा, साक्षी, स्वरा या नातींच्या मदतीने स्वयंपाकासह अन्य कामांची धुरा आवडीने सांभाळते.
सध्या हे अख्खं कुटुंबच या व्यवसायात सहभागी असल्याने पूर्णपणे व्यग्र आहे.
केवळ तीन दिवसच व्यवसाय
आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशीच मच्छी व्यवसाय सुरू असतो. सर्व प्रकारची ताजी आणि सुकी मच्छीची विक्री करतानाच, ग्राहकांना ती कापून हवी असल्यास तीही सुविधा देतात. मच्छी अधिकाधिक ताजी देण्यावर भर असतो. ग्राहकांचा व्हाॅट्स ॲप ग्रुपही आहे. त्यावर कुठले कुठले मासे उपलब्ध आहेत, त्यांचे फोटो टाकले जातात. प्रसंगी घरपोच सेवाही दिली जाते.
कोटसाठी
गेल्यावर्षी अगरबत्तीचा व्यवसाय ठप्प झाला. काहीही सुचत नव्हते. मात्र, अचानक मच्छी व्यवसाय करावा, असे डोक्यात आले. सध्या या व्यवसायात घरातील सगळ्यांची साथ मिळतेय. त्यामुळे आमचा सर्व परिवार आनंदी आहे.
- अविनाश लाकडे, व्यावसायिक
या बातमीला ७ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये अविनाश लाकडे नावाने फोटो आहेत.