पिंपळोलीतील नवदाम्पत्यास पोलिसांकडून अनोख्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:34+5:302021-05-05T04:52:34+5:30
मंडणगड : कोरोना संक्रमणापासून तालुकावासीयांना दूर ठेवण्याच्या मोहिमेत आता मंडणगड पोलीस स्थानकानेही आपला सहभाग नोंदविला आहे. लग्न समारंभात काेराेनाचे ...
मंडणगड : कोरोना संक्रमणापासून तालुकावासीयांना दूर ठेवण्याच्या मोहिमेत आता मंडणगड पोलीस स्थानकानेही आपला सहभाग नोंदविला आहे. लग्न समारंभात काेराेनाचे नियम पाळले जात नसल्याने आता पाेलिसांनी थेट नवदाम्पत्यास आराेग्यविषयक शुभेच्छा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. पिंपळाेलीतील नवदाम्पत्याला पाेलिसांकडून आराेग्य तपासणी करण्यात आली.
कोरोना काळात लग्नसमारंभात ग्रामीण भागात गर्दीचे नियम पाळले जात नाहीत. कोरोना कालावधीत सोशल डिस्टन्सिंग व शासनाने सांगितलेले नियम आपल्या जीविताच्या रक्षणाकरिता किती आवश्यक आहेत ते समजावून सांगण्यासाठी मंडणगड पोलीस स्थानकाने मोहीम हाती घेतली आहे. २ मे २०२१ रोजी पिंपळोली येथील लग्नसमारंभ येथे पोलिसांनी थर्मल टेस्ट व ऑक्सिजन तपासणी केली. वधू, वराला शुभेच्छा दिल्या. नियम पालन करून लग्न पार पडले, शिवाय पंचक्रोशीतील गावांमध्ये नागरिकांची अशाच प्रकारे तपासणी केली. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून गाव दत्तक घेऊन तपासणी करण्याच्या संकल्पनेने पोलिसांनी खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडवून दिले. यावेळी पोलीस नाईक अजय इदाते, पोलीस अंमलदार विजय वळवी, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली गावडे उपस्थित होते.
...........................
मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील विवाह समारंभात पाेलिसांतर्फे तपासणी करण्यात आली.