शेतकऱ्यांसाठी अनोखी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:19+5:302021-07-07T04:38:19+5:30
रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती, कीड रोगापासून शेतीचे हाेणारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना ...
रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती, कीड रोगापासून शेतीचे हाेणारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी अनोखी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
इफ्को टोकिओ जनरल इन्सुरन्स कंपनीची यासाठी निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची या पीक विमा योजनेसाठी निवड करण्यात आली असून, भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. भातासाठी एका हेक्टरकरिता ४५ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कम जाहीर करण्यात आली आहे, तर नाचणीसाठी २० हजार रुपये निश्चित केली आहे. भातासाठी ९१० रुपये, तर नाचणीसाठी ४०० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांसाठी निश्चित केला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी १५ जुलैपयेत सहभागी होऊ शकतात.
हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूरक्षेत्र, जलमय, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड यामुळे उत्पन्नात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान पीक विमा योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.