नागरिकत्व कायदा समर्थनार्थ खेडात एकता पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:44 PM2019-12-28T15:44:56+5:302019-12-28T15:49:51+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
खेड : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
खेड शहरातील समर्थनगर येथून निघालेली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी. बसस्थानकमार्गे वाणी पेठ , बाजारपेठ, पानगल्ली, गुजर आळी, सोनार आळी, ब्राह्मण आळी, हनुमान पेठ, पोलीस स्टेशनमार्गे प्रांत कार्यालयात पोहोचल्यावर या पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणांनी खेड शहर दुमदुमून गेले.
पदयात्रा प्रांत कार्यालयाजवळ आल्यानंतर याठिकाणी यात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतातील कोणत्याही धर्माला किंवा जातीला विशेषत: मुस्लिम समाजाला कोणताही धोका नाही. परंतु त्याचा अपप्रचार करून नाहक हिंसाचार घडवून आणला जात आहे.
या कायद्याचे सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी या विधिरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी अॅड. मिलिंद जाडकर यांनी सांगितले.
नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शशिकांत चव्हाण, संजय मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या एकता पदयात्रेनंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांची भेट घेऊन या कायद्याचा समर्थन करणारे आपले निवेदन सादर केले.